ब्रम्हानंद जाधव, मेहकर (बुलडाणा)दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक संकटांमुळे वर्षाकाठी राज्यभरात लाखो हेक्टर क्षेत्र बाधित होत आहे. गत पाच वर्षात राज्यातील २ कोटी ७८ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. दरम्यान, पाच वर्षात खरीप हंगामात उत्पादनाला जवळपास ६० ते ७० टक्के फटका बसत असल्याने, शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे.राज्यातील खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र १३४ लाख ७० हजार हेक्टर आहे; परंतु काही वर्षांपासून दुष्काळाची दाहकता वाढतच असल्याने खरीप हंगामातील क्षेत्रावर परिणाम होत असल्याचे जाणवत आहे. पर्यावरणाचे संतुलन बिघडल्याने कधी कोरडा, तर कधी ओला दुष्काळ निर्माण होत आहे. या दुष्काळाचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. गत पाच वर्षात राज्यात दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गीक आपत्तीने वर्षाकाठी लाखो हेक्टर जमीन बाधित होऊन सुमारे २ कोटी ७८ लाख ८८ हजार शेतकऱ्यांना फटका बसला. यावर्षीची परिस्थिती आणखी गंभीर आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना दुष्काळ आणि गारपिटीमुळे खरीप आणि रब्बी हंगामाच्या शेवटी शेतातील उत्पादनातून केवळ भोपळाच हाती उरत असल्याचे दिसून येत आहे. जून, जुलै आणि आॅगस्ट या पेरणीच्या मोसमातच पाऊस ओढ देत असल्याने राज्यावर दुष्काळाचे सावट गडद होत चालले आहेत. शेतकऱ्यांना दरवर्षी दुबार ते तिबार पेरणीचा सामना करावा लागत आहे.
खरीप हंगामातील उत्पादन घसरले
By admin | Published: October 16, 2015 10:17 PM