नवी दिल्ली - जून २०२४ मध्ये वस्तू उत्पादन क्षेत्रातील तेजीचे वातावरण कायम राहिले. तसेच रोजगाराच्या संधीतही मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. वस्तू उत्पादन क्षेत्राच्या ‘पीएमआय’मधून ही माहिती समोर आली.
‘इंडिया मॅन्यूफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स‘ (पीएमआय) जूनमध्ये ५८.३ अंकांवर राहिला. मेमध्ये तो ५७.५ अंकांवर होता. व्यावसायिक स्थितीत वाढ झाल्याचे या आकडेवारीतून दिसून येते. ५० अंकांच्या वरील पीएमआय वृद्धी, तर ५० अंकांच्या खालील पीएमआय घसरण दर्शिवतो.
कायम राहणार तेजी
अहवालात म्हटले आहे की, आगामी काही वर्षांत वस्तू उत्पादन क्षेत्रात सकारात्मक तेजी पाहायला मिळू शकते. यंदा ऑर्डर बुक, डिमांड बुक यांत सुधारणा दिसून आली.
राेजगार निर्मितीचा १९ वर्षांचा उच्चांक
सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, देशांतर्गत विक्री आणि निर्यातीमध्ये तेजी आल्यामुळे वस्तू उत्पादन क्षेत्राच्या वृद्धीला गती मिळाली आहे. सातत्याने ऑर्डर येत असल्यामुळे आता कंपन्या नियुक्त्यांकडे लक्ष देत आहेत. मार्च २००५ नंतर जून २०२४ मध्ये सर्वाधिक रोजगार संधी या क्षेत्रात दिसून येत आहेत. ‘एचएसबीसी’च्या अर्थतज्ज्ञ मैत्रेयी दास यांनी सांगितले की, मागील १९ वर्षांत जून २०२४ मध्ये सर्वाधिक रोजगार निर्मिती झाली आहे.
ऑर्डर वाढल्याने कच्च्या मालाला मागणी
अहवालानुसार, कच्च्या मालाच्या खरेदीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. कच्च्या मालाच्या मागणीतील वाढ आणि वाहतूक खर्चातील तेजी यामुळे परिचालन खर्च वाढला आहे. जूनमध्ये ऑर्डर वाढल्या आहेत. अनेक कंपन्यांनी ‘हायर इनफ्लो’साठी आशियासह, ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, युरोप आणि अमेरिका यांना जबाबदार धरले आहे.