नवी दिल्ली : प्रवाशांना रेल्वेमध्ये स्वयंसहायता गटांची उत्पादने उपलब्ध होऊ शकतात. रेल्वेच्या ई-केटरिंग सेवेशी या स्वयंसहायता गटांना जोडून त्यांची उत्पादने प्रवाशांना उपलब्ध करून देण्याच्या कल्पनेस सरकारची तयारी आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी बुधवारी लोकसभेत प्रश्नोत्तर तासात ही माहिती दिली. ते म्हणाले की, यासंदर्भातील पायलट योजना याआधीच सुरू झालेली असून, असे स्वयंसहायता गट आपली उत्पादने रेल्वेत प्रवाशांना विकतही आहेत. ई-केटरिंग सेवेमार्फत जी उत्पादने विकली जातील त्यांचा दर्जा मात्र सर्वोच्चच असला पाहिजे. केवळ तीच उत्पादने स्वीकारली जातील, असे ते म्हणाले. कमिशन पद्धतीने तिकिटे विकण्यासाठी ‘हाल्ट कॉन्ट्रॅक्टर्स’ व ‘हाल्ट स्टेशन्स’ नियुक्त करण्याच्या निर्णयाचे प्रभू यांनी समर्थन केले.
बचत गटांची उत्पादने आता रेल्वेत मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2017 12:21 AM