मुंबई : आशियाई बाजारात मजबुतीचा कल असतानाही भारतीय शेअर बाजार बुधवारी घसरले. नफा वसुलीचा फटका बसल्याने मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३७.६७ अंकांनी घसरून २६,५५२.९२ अंकांवर बंद झाला.बाजारातील जाणकारांनी सांगितले की, काही ब्ल्यूचीप कंपन्यांचे कमजोर तिमाही निकाल आणि विदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेला विक्रीचा सिलसिला यामुळे बाजारात घसरण पाहायला मिळाली. आशियाई बाजारांतील तेजी आणि अमेरिकी बाजारांनी काल केलेली उत्तम कामगिरी यामुळे बीएसई सेन्सेक्स सकाळी तेजीत होता. तब्बल २१0 अंकांची वाढ त्याने मिळविली होती. तथापि, नंतर नफा वसुलीचे सत्र सुरू झाले आणि बाजार खाली आला. सत्राच्या अखेरीस ३७.६७ अंकांची अथवा 0.१४ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,५५२.९२ अंकांवर बंद झाला. काल सेन्सेक्स ३१.४४ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१00 अंकांचा टप्पा ओलांडून वर चढला होता. तथापि, नंतर ही वाढ टिकली नाही. सत्राच्या अखेरीस ८,0४0.२0 अंकांवर बंद होता, त्याने २0.५0 अंकांची अथवा 0.२५ टक्क्यांची घट नोंदविली.आयसीआयसीआय बँकेचा समभाग सर्वाधिक २.0६ टक्के घसरला. त्याखालोखाल गेलला फटका बसला. घसरण सोसणाऱ्या अन्य कंपन्यांत सन फार्मा, आरआयएल, लुपीन, एनटीपीसी, सिप्ला आणि इन्फोसिस यांचा समावेश आहे.घसरणीचा माहौल असतानाही लाभ मिळविणाऱ्या कंपन्यांत टाटा मोटर्स, एमअँडएम, बजाज आॅटो, कोल इंडिया आणि हीरो मोटोकॉर्प यांचा समावेश आहे. या कंपन्यांतील तेजीने सेन्सेक्समधील घसरण मर्यादित राहिली. (वृत्तसंस्था)
सेन्सेक्सला नफावसुलीचा फटका
By admin | Published: November 05, 2015 3:12 AM