अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग रिसर्चविरोधात पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. अमेरिकास्थित शॉर्ट सेलर कंपनीनं खोटे आणि दिशाभूल करणारे अहवाल सादर करून कंपनीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर कंपनीचे शेअर्स जाणीवपूर्वक खाली आणले आणि नफा कमावला. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला अमेरिकास्थित शॉर्टसेलरने एक अहवाल प्रकाशित केला होता, असं अदानींनी शेअरधारकांना दिलेल्या संदेशात म्हटलं.
ज्या वेळी अदानी समूह आपला सर्वात मोठा आयपीओ आणण्याच्या तयारीत होता, तेव्हाच हा रिपोर्ट समोर आला होता. हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये चुकीची माहिती देण्यात आली आणि समुहाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. या रिपोर्टचा उद्देश समुहाच्या प्रतिष्ठेला नुकसान पोहोचवणं आणि शेअर्सच्या किंमती जाणूनबुजून कमी करणं आणि त्याद्वारे अधिक नफा मिळवणं हा असल्याचं अदानींनी आपल्या कंपनीच्या अॅन्युअल रिपोर्टमध्ये म्हटलं.
प्रतिकूल परिणामांचा सामना
एफपीओ पूर्णपणे सबस्क्राईब झाल्यानंतही, कंपनीनं गुंतवणूकदारांच्या हितांचं रक्षण करत पैसे परत करण्याचा निर्णय घेतला. याशिवाय शॉर्ट सेलिंग फर्मच्या रिपोर्टमुळे अनेक प्रतिकूल परिणाम समोर आले, त्याचा कंपनीला सामना करावा लागल्याचं अदानी म्हणाले. जरी समुहाकडून त्याचं खंडन करण्यात आलं, तर काही संस्था आणि लोकांनी शॉर्ट सेलरकडून आलेल्या दाव्यांमधून संधी शोधत फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वृत्त आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट नरेटिव्ह बिंबवण्याचा प्रयत्न केल्याचे अदानींनी नमूद केलं.
समितीची स्थापना
सर्वोच्च न्यायायलानं या प्रकरणाच्या तपासासाठी एक तज्ज्ञ समितीची स्थापना केली, त्यांना समुहाद्वारे कोणतंही रेग्युलेटरी फेल्युअर सापडलं नाही. सेबीलाही येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपला अहवाल सोपवायचा आहे, आम्ही आपल्या गव्हर्नन्स आणि डिस्क्लोजर स्टँडर्डबाबत सकारात्मक आहोत, असंही त्यांनी नमूद केलं. २४ जानेवारी रोजी हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण दिसून आली होती, तसंच कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये मोठी घसरण झाली होती. दरम्यान, या अहवालाचं समुहाकडून खंडन करण्यात आलं होतं.