How to Buy Good Home : स्वत:च्या घरात जो आनंद, स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचा अनुभव येतो तो भाड्याच्या घरात मिळणे शक्य नाही. भाड्याच्या घरात राहत असताना अनेकदा पार्किंग, वाहतूक, वीज आणि पाण्याच्या बिलांव्यतिरिक्त सामायिक क्षेत्रावरुन वाद उद्भवू शकतात. भाडेकरू आणि मालक यांच्यातील संबंध कितीही चांगले असले तरी एक ना एक दिवस घर रिकामे करावे लागते. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर हवे असते. या दिवाळीत तुम्हीही नवीन घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. अन्यथा लाखो रुपये खर्च करुन तुमच्यावर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.
बजेट सर्वात महत्त्वाचंकोणतीही मालमत्ता विकत घेण्यापूर्वी, त्यासाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता हे ठरवणे महत्त्वाचे आहे. ही रक्कम तुम्ही कशी उभारणार आहात? यासाठी तुमची स्वतःची बचत वापराल किंवा नातेवाईकांची मदत की बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज घ्याल याची खात्री करा. जर तुम्ही तुमच्या खिशातून पैसे खर्च करणार असाल तर काळजीचे कारण नाही. मात्र, कर्ज काढून घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमचे उत्पन्न, खर्च आणि बचत यातून ईएमआयचं गणित बसवावं लागेल.
भविष्यातील गरजांचा विचारसध्या तुमचं काम एका बेडरूमच्या फ्लॅटमध्ये म्हणजेच २ खोल्यांमध्ये भागत असेल तर भविष्यात तुमच्या गरजांमध्ये कोणताही बदल होणार नाही असे समजू नये. तुमच्या भविष्यातील गरजा लक्षात ठेवा. आज तुमच्यासोबत आईवडील असतील तर तुमचे कुटुंब वाढल्यानंतर जागेची कमतरता भासू शकते. त्यामुळे घर घेताना किती खोल्यांचे घ्यावे याचा विचार तुमचे बजेट पाहून करणे योग्य राहील. अन्यथा घरी कोणी नातेवाईक आले तर राहण्याची मारामार होऊ नये.
परिसर आणि लिविंग कॉस्टतुम्ही घर खरेदी करत असलेल्या भागात राहण्याचा खर्च (लिविंग कॉस्ट) आणि आजूबाजूचा परिसर पाहणे देखील महत्त्वाचे आहे. राहण्याचा खर्च म्हणजे वाहतुकीच्या साधनांवर होणारा खर्च आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी होणारा खर्च. सुविधा आणि राहण्याचा खर्च एकाच परिसरात असलेल्या वेगवेगळ्या वसाहतींमध्ये भिन्न असू शकतो. स्वच्छता, सुरक्षा, घरांची रचना, गार्डन, पार्किंग आणि मोकळा परिसर अशा विविध सुविधांमुळे यात कमी जास्त खर्च होऊ शकतो.
गुन्हेगारी रेकॉर्डतुम्ही कोणत्याही शहरात घर खरेदी करताना तेथील भागातील गुन्हेगारी दराकडे नक्कीच लक्ष द्या. मुंबई आणि पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात गुन्हेगारीचा दर वेगळा पाहायला मिळतो. सुरक्षा आणि गुन्ह्याबद्दल मालमत्ता विक्रेते आणि RWA अधिकाऱ्यांशी बोलून माहिती घ्या. ज्या वसाहतीत किंवा सोसायटीमध्ये तुम्ही घर घेण्याचे ठरवले आहे ती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सुसज्ज असली पाहिजे यात शंका नाही, पण तुम्हाला तुमच्या घरापर्यंत आणि सोसायटीपर्यंत नेणारे रस्ते कितपत सुरक्षित असतील हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
रोजगार आणि भविष्यातील सुविधाकार्यालयीन जागा, कारखाने किंवा जवळपास किरकोळ सुविधा असलेल्या अशा निवासी भागांमध्ये घरांची मागणी असते. याठिकाणी काळानुरूप दर वाढतच राहतात. एवढेच नाही तर घराजवळ रोजगाराची साधने उपलब्ध झाली तर ये-जा करताना लागणारा वेळही वाचतो. त्यामुळेच गेल्या दोन-तीन दशकांत पुणे आणि मुंबईसह आसपासच्या शहरातही मागणी वाढत आहे.
पायाभूत सुविधापायाभूत सुविधा हा देखील घर खरेदीचा एक महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही घर कुठे घेत आहात, रस्ते आणि त्यांची रुंदी कशी आहे, ट्रॅफिक जाम झाल्यास पर्यायी व्यवस्था काय आहे, सांडपाण्याबरोबरच ड्रेनेज, शॉपिंग-शालेय सुविधा आदी छोट्या-छोट्या गोष्टींकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. घर खरेदी केल्यानंतर अनेक वर्षे तुम्हाला या सर्व गोष्टींची चिंता करावी लागणार नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही वरील मुद्दे लक्षात घेऊन घर विकत घेतले तर तुम्हाला ते फार काळ बदलण्याची किंवा ते विशिष्ट क्षेत्र सोडून इतर ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही.