Join us

दुसऱ्या पत्नीला प्रॉपर्टीत अधिकार मिळतो का? पतीच्या मालमत्तेचे खरे वारसदार कोण? काय आहे कायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 12:07 IST

Property Rights : पतीच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा हक्क असला तरी तो मिळवण्यासाठी २ महत्त्वाच्या अटी आहेत. त्या अटी पूर्ण होत नसल्यास प्रॉपर्टीत अधिकार मिळत नाही.

Property Rights : आपल्या देशातील न्यायालयांमध्ये सर्वाधिक खटले हे संपत्तीच्या वादाचे आहेत. मालमत्तेचे विभाजन हा नेहमीच अनेक कुटुंबांमध्ये, विशेषत: भावांमधील वादाचा प्रमुख मुद्दा राहिला आहे. पुत्रांसह मुलीही वडिलांच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकतात. अलीकडच्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप किंवा दुसऱ्या पत्नीने पतीच्या प्रॉपर्टीत हिस्सा मागितल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. पतीच्या मालमत्तेमध्ये दुसऱ्या पत्नीचे हक्क प्रामुख्याने २ कारणांच्या आधारे निश्चित केले जातात. यातील पहिली म्हणजे विवाहाची कायदेशीर वैधता आणि धार्मिक आधारांवर लागू होणारे नियम आणि कायदे.

दुसरी पत्नी कधी मागू शकते हिस्सा?कायद्यानुसार, जर संबंधित विवाह वैध ठरत असेल तर दुसरी पत्नी पतीच्या मालमत्तेवर हक्क मागू शकते. हिंदू विवाह कायदा, १९५५ नुसार, दोघांपैकी कोणाचाही जोडीदार हयात नसेल किंवा त्यांच्यात घटस्फोट झाला असेल तरच दुसऱ्या विवाहाला कायदेशीर दर्जा मिळतो. या दोनपैकी एक अटी पूर्ण झाल्यास दुसरा विवाह वैध ठरतो. भारतातील वारसा कायदा, कायदेशीररित्या वैध विवाह झाल्यास, दुसऱ्या पत्नीला पहिल्या पत्नीच्या बरोबरीने वागणूक देतो. मालमत्तेत देखील समान वाटा घेण्याचा अधिकार तिला आहे.

विवाह वैध नसला तरीही हा अधिकार मिळतोजर पतीचा दुसरा विवाह कायदेशीररीत्या वैध नसेल, तर दुसरी पत्नी पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेवर कोणताही दावा करू शकणार नाही. मात्र, पतीच्या स्व-अधिग्रहित मालमत्तेच्या बाबतीत ही अट लागू होणार नाही. पती मृत्यूपत्राद्वारे त्याच्या दुसऱ्या पत्नीसह कोणालाही संपत्ती देऊ शकतो. जर मृत्यूपत्र न सोडता पतीचा मृत्यू झाला तर त्याची मालमत्ता त्याच्या कायदेशीर वारसांमध्ये विभागली जाईल. उत्तराधिकार कायद्यानुसार त्याच्या सर्व वारसांमध्ये त्याच्या मालमत्तेचे समान वाटप होईल.

टॅग्स :बांधकाम उद्योगन्यायालयहिंदू