Property Price Hike: प्रत्येकाला आपले स्वत:च्या मालकीचे घर विकत घ्यावे असे कायम वाटत असते. घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर एप्रिल ते जून या तिमाहीत घरांच्या किमतीत बंपर वाढ झाली आहे. ४२ शहरांमध्ये घरांच्या किमतीत वाढ झाली आहे. तर, ५ शहरांमध्ये घरांच्या किमतीत घट झाली असून, ३ शहरांमध्ये मात्र किमती 'जैसे थे' आहेत. याबाबतची माहिती नॅशनल हाऊसिंग बँकेच्या (NHB) घरांच्या किंमती निर्देशांकावरून मिळाली आहे.
घरांचे दर किती वाढले?
नॅशनल हाऊसिंग बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, ८ प्रमुख महानगरांमध्ये वार्षिक आधारावर निर्देशांकात वाढ करण्यात आली आहे. यामध्ये अहमदाबाद (१३.५ टक्के), बेंगळुरू (३.४ टक्के), चेन्नई (१२.५ टक्के), दिल्ली (७.५ टक्के), हैदराबाद (११.५ टक्के), कोलकाता (६.१ टक्के), मुंबई (२.९ टक्के) आणि पुणे (३.६ टक्के) या शहरांचा समावेश आहे. ५० शहरांचा निर्देशांक तिमाही आधारावर १.७ टक्क्यांनी वाढला आहे. गेल्या तिमाहीत तो २.६ टक्क्यांनी वाढला होता.
नवी मुंबईत घरांच्या किमती पडल्या!
घरांच्या किंमत निर्देशांकात (HPI) वार्षिक आधारावर मोठा फरक होता. कोईम्बतूरमध्ये निर्देशांक १६.१ टक्क्यांनी वाढले. त्याच वेळी नवी मुंबईत मात्र घर किंमत निर्देशांकात ५.१ टक्क्यांनी घट झाली. घरांच्या किंमत निर्देशांकाच्या बाबतीत, २०१७-१८ हे आधार वर्ष म्हणून धरले जाऊन तिमाही आधारावर ५० शहरांमधील मालमत्तेच्या किमतींबाबत अभ्यास केला जातो.