अकोला : पश्चिम विदर्भात तुती लागवडीचे क्षेत्र वाढत असून, यावर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी उद्दिष्टापेक्षा जास्त प्रस्ताव रेशीम कार्यालयांना पाठवणे सुरू केले आहे. अकोला जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा १५६ प्रस्ताव जास्त आले आहेत. राज्यभरात हा आकडा पाच हजारांच्या पार गेला आहे.
कमी पावसात भरघोस उत्पादन देणारे पीक म्हणून तुती (रेशीम) या पिकाची ख्याती आहे. यावर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात समूहाने तुती लागवड करण्यासाठी रेशीम संचालनालयाने कार्यक्रम आखला आहे.
यात पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यांना बाराशे हेक्टरचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
यावर्षी अनेक ठिकाणी आतापर्यंत ९० टक्के तुतीची लागवड केली आहे. पावसाची अनिश्चितता बघता इतर शेतकरीही या पिकाकडे वळत असून, तुती लागवडीचे प्रस्ताव वाढत आहेत.
अकोला जिल्ह्याला यावर्षी २४० हेक्टर क्षेत्रावर तुती लागवडीचे उद्दिष्ट रेशीम संचालनालयाने दिले होते; परंतु यात वाढ झाली असून, १५६ शेतकऱ्यांचे अतिरिक्त प्रस्ताव जिल्हा रेशीम कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. यामध्ये वाढ सुरू च असून, इतर जिल्ह्यातही असेच चित्र आहे. राज्यभरात आजमितीस पाच हजारांच्यावर नवे प्रस्ताव आले
आहेत. तुती या पिकाला पाण्याची जास्त गरज भासत नाही, केवळ या पिकाचे व्यवस्थापन व्यवस्थित करावे लागते. ते काम सोपे असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाची कास धरली आहे.
अकोला जिल्हा रेशीम कार्यालयाने यावर्षी तुतीची रोपे तयार करण्याचा कार्यक्रम राबवला. त्यामुळे यावर्षी ९० टक्के क्षेत्रावर
तुतीची रोपाद्वारे लागवड करण्यात आली आहे. रोपे लावल्याने नुकसान होण्याची शक्यता कमी असते, हे विशेष.
पाणीटंचाईमुळे तुती लागवडीचे प्रस्ताव वाढले
पश्चिम विदर्भात तुती लागवडीचे क्षेत्र वाढत असून, यावर्षी पावसाच्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांनी उद्दिष्टापेक्षा जास्त प्रस्ताव रेशीम कार्यालयांना पाठवणे सुरू केले आहे
By admin | Published: August 23, 2015 10:36 PM2015-08-23T22:36:18+5:302015-08-23T22:39:08+5:30