Join us

रेल नीरच्या ५०० मिली बाटल्यांचा प्रस्ताव रखडला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2019 7:06 AM

प्रवाशांना बसतोय भुर्दंड : खरेदी करावी लागते एक लीटरची बाटली

मुंबई : रेल नीरच्या बाटल्या ५०० मिलीच्या असाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. मात्र, ५०० मिली पाण्याच्या बाटल्या तयार करण्याचा प्रस्ताव रखडला आहे. परिणामी, प्रवाशांना एक लीटरची बाटली खरेदी करून जादा पैसे मोजावे लागत आहे. इंडियन रेल्वे टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)द्वारे पिण्याच्या पाण्यासाठी ‘रेल नीर’ नावाच्या पाण्याच्या तयार केल्या जातात. या बाटल्याचे वितरण संपूर्ण मुंबई विभागातील रेल्वे स्थानकावर होते. रेल्वे स्थानकावर प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहेत. मात्र, रेल्वे प्रवासी सर्वाधिक पसंती रेल नीरच्या बाटल्यांना देतात, परंतु रेल्वे स्टॉलवर विक्रीसाठी रेल नीरची बाटली १ लीटरची आहे. त्यामुळे प्रवाशांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी विकत घ्यावे लागते. रेल नीरची बाटली ५०० मिलीची असावी, अशी मागणी अनेक कालावधीपासून प्रवाशांकडून केली जात आहे. मात्र, हा प्रस्ताव रखडला असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली.यासाठी होतेय मागणी!प्रत्येक प्रवाशांकडून ५०० मिलीची बाटलीची मागणी केली जात आहे. कारण एक लीटरची बाटली प्रवासात घेऊन फिरणे कठीण होते. रेल्वे स्टॉलधारकांकडून प्रवाशांच्या मागणीबाबत उदासीनता आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या मागणीचा विचार करून ५०० मिली बाटल्यांची निर्मिती करावी, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र रेल्वे महिला प्रवासी महासंघाच्या अध्यक्षा वंदना सोनावणे यांनी दिली.दरदिवशी एकूण दीड लाख पाण्याच्या बाटल्यांचा पुरवठा मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकावर केला जातो. अंबरनाथ येथे एक लीटरच्या पाण्याच्या बाटल्या (रेल नीर) तयार करण्याचा प्रकल्प आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे प्रवाशांना अंबरनाथ येथून पाण्याचा पुरवठा केला जातो.

टॅग्स :रेल्वेपाणी