मुंबई : ७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच अंध व अपंगांना डिसेंबर अखेरपासून घरपोच प्राथमिक बँकिंग सेवा द्या, असे आदेश रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिले आहेत.
रिझर्व्ह बँकेने यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे. तिची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक व अंध-अपंगांचा रोख रकमेचा भरणा व अदायगी (पीक-अप अॅण्ड डिलिव्हरी), चेकबुक आणि डिमांड ड्राफ्ट या सेवा घरपोच मिळतील.
रिझर्व्ह बँकेने म्हटले की, अनेकदा बँका ज्येष्ठ नागरिक आणि अंध-अपंगांना बँक शाखांतून परत पाठवितात, असे आढळून आले आहे. त्यामुळे या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासाठी बँकांनी घरपोच सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि अंध-अपंग यांच्याप्रमाणेच वैद्यकीय प्रमाणित जुनाट आजार अथवा शारीरिक अक्षमता असलेल्या व्यक्तींनाही या सेवेचा लाभ मिळेल.
यासंबंधीच्या सूचना बँका, छोट्या वित्तीय संस्था आणि पेमेंट बँका यांच्यासाठी निर्गमित करण्यात आल्या आहेत. या सूचनांनुसार
वरील श्रेणीत येणाºया नागरिकांना रोख रकमेचा भरणा करण्यासाठी तसेच खात्यावरील पैसे काढण्यासाठी बँक शाखेत जाण्याची गरज
पडणार नाही. डिमांड ड्राफ्टही त्यांना घरपोच मिळेल. केवायसी दस्तावेज आणि हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी त्यांना बँकेत जावे लागणार नाही. बँकेचे प्रतिनिधी त्यांच्या घरी येऊन संबंधित दस्तावेज घेऊन जातील.
या निर्देशांची अंमलबजावणी ३१ डिसेंबरपासून करण्याच्या सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत. या घरपोच सेवेची माहिती बँकांना आपल्या प्रत्येक शाखेत तसेच वेबसाइटवर ठळकपणे द्यावी लागेल. डिजिटल व्यवहार आणि एटीएम यांच्या वापरावर जोर दिला जात असला तरी ज्येष्ठ नागरिक आणि अंध-अपंगांबाबत संवेदनशील असणेही आवश्यक आहे, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
नूतनीकरणही लगेच होणार
निवृत्तिवेतनधारकांचे ज्या बँकेत निवृत्तिवेतन खाते आहे, त्या बँकेच्या कुठल्याही शाखेत हयात प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा निवृत्तांना आहे. तथापि, कोअर बँकिंग सोल्युशन सिस्टिमद्वारे प्राप्तकर्ता बँकेकडून हे प्रमाणपत्र तत्परतेने नूतनीकृत केले जात नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे निवृत्तिवेतनधारकांना अडचणींचा सामना करावा लागतो. हे टाळण्यासाठी हयात प्रमाणपत्र त्वरित नूतनीकृत करण्यात यावे, अशा सूचनाही बँकांना देण्यात आल्या आहेत.
७0 वर्षांवरील ज्येष्ठांना घरपोच बँकिंग सेवा द्या - रिझर्व्ह बँक
७० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच अंध व अपंगांना डिसेंबर अखेरपासून घरपोच प्राथमिक बँकिंग सेवा द्या, असे आदेश रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना दिले आहेत.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 04:40 AM2017-11-11T04:40:57+5:302017-11-11T04:41:53+5:30