Join us

५ वर्षांत PSUs ठरलेत रिटर्नचे 'किंग'; '६०-७०% घसरल्यानंतर ब्लू-चिप शेअर्सवर ठेवा नजर'; कोणते आहेत स्टॉक्स? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 13:42 IST

29th Motilal Oswal Wealth Creation Study : बाजारातील ट्रेंड आणि थीमच्या बाबतीतील एक रिपोर्ट मोतीलाल ओस्वालकडून जारी करण्यात आलाय. पाहा कोणत्या कंपन्यांनी आतापर्यंत सर्वाधित संपत्ती निर्माण केली आहे.

29th Motilal Oswal Wealth Creation Study : गेल्या काही महिन्यांमध्ये सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली होती. परंतु नंतर त्यात करेक्शनही झालं. दरम्यान, बाजारातील ट्रेंड आणि थीमच्या बाबतीतील एक रिपोर्ट मोतीलाल ओस्वालकडून जारी करण्यात आलाय. यामध्ये गेल्या ५ वर्षांतील विस्तारानं अभ्यास करण्यात आलाय. इतकंच नाही तर वेल्थ क्रिएशन थीमचाही रोडमॅप त्यांनी सादर केलाय.

इंडेक्समध्ये २०-२२ ब्लू-चिप्स कंपन्या असल्यामुळे दीर्घकाळात निफ्टीला मागे टाकणं कठीण ठरेल, असं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. या रिपोर्टमध्ये निफ्टीच्या सर्व कंपन्यांना ब्लू चिप मानण्यात आलंय. ब्लू चिप म्हणून एकूण १०७ कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. ब्लूचिप बनण्यासाठी कंपनीकडे १० वर्षांसाठी २० टक्के आरओई असणे आवश्यक आहे.

रिपोर्टमधील महत्त्वाच्या बाबी

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिडेट सलग ६ वेळा सर्वात मोठी वेल्थ क्रिएटर कंपनी ठरली आहे. अदानी ग्रीनमध्ये सर्वात जलद संपत्ती निर्मिती झाली आहे. सर्वात जलद संपत्ती निर्माण करणाऱ्यांमध्ये अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पॉवर यांचा समावेश आहे. लिंडे इंडिया ही सर्वात सातत्यपूर्ण संपत्ती निर्माण करणारी कंपनी आहे. मोतीलाल ओसवाल यांच्या रिपोर्टनुसार लार्ज कॅपमध्ये संपत्ती निर्मितीच्या चांगल्या संधी आहेत. परंतु लार्ज कॅपचं व्हॅल्युएशन अधिक आहे. त्यात भांडवल बुडण्याची शक्यताही कमी आहे. लार्जकॅपमध्ये पैसे कमावण्यासाठी चांगल्या लार्जकॅपवर लक्ष ठेवा. क्षेत्राची वाढ आणि व्यवस्थापनावर लक्ष ठेवण्यास यामध्ये सांगण्यात आलं.

.. तर त्यात तेजीची शक्यता

जेव्हा जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा १२ महिन्यांत रिकव्हरी होते. यशस्वी कंपन्या भांडवली वाटपात अनेकदा चुका करतात. तेजीनंतरही एसबीआयचे मूल्यांकन स्वस्त आहे. १५० रुपयांपासून ८०० रुपयांपर्यंत चालल्यानंतरही एसबीआयची किंमत स्वस्त आहे. ब्लूचिप शेअर्समध्ये ६०-७० टक्क्यांची घसरण झाल्यानंतर त्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. ६० ते ७० टक्क्यांच्या घसरणीनंतर ब्लूचिप शेअर्समध्ये टर्नअराऊंड होण्याची शक्यता आहे. लार्ज कॅप गुंतवणुकीसाठी चांगले दिसत आहेत. संयम बाळगणं आवश्यक असून घाईगडबडीत गुंतवणूकीपासून बचाव केला पाहिजे. ब्लू-चिप कंपनीमध्ये मोठा बदल होण्याची क्षमता आहे. चौथ्या तिमाहीपासून अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची शक्यता असून आर्थिक वर्ष २०२६ पासून अर्थव्यवस्था वेगाने वाढेल, असंही त्यात नमूद करण्यात आलंय.

सर्वात मोठे वेल्थ क्रिएटर

मोतीलाल ओसवाल यांच्या रिपोर्टनुसार, रिलायन्स गेल्या पाच वर्षांत ११,१७८ अब्ज रुपयांची संपत्ती निर्माण करून सर्वात मोठी संपत्ती निर्माण करणारी कंपनी ठरली आहे. त्यापाठोपाठ टीसीएस ८,३१२ अब्ज रुपयांसह दुसऱ्या, भारती एअरटेल ५,४४९ अब्ज रुपयांसह तिसऱ्या, आयसीआयसीआय बँक ५,१०९ अब्ज रुपयांसह चौथ्या, एसबीआय ४,१७६ अब्ज रुपयांसह पाचव्या आणि इन्फोसिस ३८९३ अब्ज रुपयांसह सहाव्या क्रमांकावर आहे.

सर्वात जलद वेल्थ क्रिएटर

सर्वात जलद संपत्ती निर्माण करणाऱ्यांमध्ये अदानी ग्रीन ११८ टक्के वार्षिक परताव्यासह पहिल्या क्रमांकावर आहे. तर ८५ टक्के वार्षिक परताव्यासह अदानी एन्टरप्राईझेस दुसऱ्या, ७७ टक्के वार्षिक परताव्यासह जिंदाल स्टेनलेस तिसऱ्या, डिक्सन टेक ७४ टक्के वार्षिक परताव्यासह चौथ्या आणि लिंडे इंडिया ६८ टक्के वार्षिक परताव्यासह पाचव्या क्रमांकावर आहे.

कन्सिस्टंट वेल्थ क्रिएटर

६८ टक्के वार्षिक परताव्यासह सर्वात जलद संपत्ती निर्माण करणाऱ्या कंपन्यांमध्ये लिंडे इंडिया पहिल्या क्रमांकावर आहे. तर, वरुण बेव्हरेजेस ६१ टक्के वार्षिक परताव्यासह दुसऱ्या, एचएएल ५८ टक्के वार्षिक परताव्यासह तिसऱ्या, बीईएल ४६ टक्के वार्षिक परताव्यासह चौथ्या आणि थरमॅक्स ३४ टक्के वार्षिक परताव्यासह पाचव्या क्रमांकावर आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक