-चंद्रशेखर बर्वे, नवी दिल्ली
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी मागील दहा वर्षांत १६ लाख ३५ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडीत खात्यात (राइट-ऑफ) टाकले असल्याची माहिती केंद्र सरकारने संसदेत दिली आहे. कर्ज ‘राइट-ऑफ’ करण्यात भारतीय स्टेट बँक पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतात व्यवसाय करीत असलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांनी १० वर्षांत १६ लाख ३५ हजार ३७९ कोटी रुपये बुडीत खात्यात टाकले. यात बड्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ९ लाख २६ हजार ९४७ कोटींच्या कर्जाचाही समावेश आहे.
२०२३-२४ मध्ये बँकांनी एकूण १,७०,२६२ कोटी रुपयांचे कर्ज राइट-ऑफ केले आहे, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही आकडेवारी लोकसभेत दिली होती.
२९ कंपन्यांनी घेतले ५ हजार कोटींपेक्षा अधिक कर्ज
पाच हजार कोटींपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या २९ कंपन्या अशा आहेत, ज्यांचे कर्ज एनपीए खात्यात वर्ग केले गेले.
या कंपन्यांवर एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज शिल्लक असल्याचे समोर आले आहे.
जागतिक बँकांचे बुडीत कर्ज
डच बँक > २,०२१ कोटी
बारक्ले बँक पीएलसी > ८३९ कोटी
को-ऑपरेटिव्ह रोबो बँक यू.ए. > ७०३ कोटी
बँक ऑफ नोव्हा स्कोटिया > ३७९ कोटी
कर्जाची वसुली वाढली
बुडीत कर्जाची रक्कम वाढत असली तरी कर्जाची वसुलीसुद्धा होत आहे. २०१८-१९ ते २०२३-२४ या पाच वर्षांच्या काळात ऋण वसुली न्यायाधिकरणामार्फत ९६,९६८ कोटी आणि सरफेसी नियमांतर्गत १ लाख ८९ हजार ६४० कोटी रुपयांची वसुली केली आहे.