नवी दिल्ली: कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. याचा काही प्रमाणात परिणाम हा देशातील सार्वजनिक बँकांवरही झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देश आणि अर्थव्यवस्था कोरोनातून सावरत असताना, सार्वजनिक बँकांसाठी अच्छे दिन आल्याचे समोर आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून बुडीत कर्जाच्या फेऱ्यात अडकलेल्या राष्ट्रीयीकृत बँकांची आर्थिक स्थिती लक्षणीय सुधारली असून, चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते डिसेंबर या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही बँकेला तोटा झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत दिली.
चालू आर्थिक वर्षांत एप्रिल ते डिसेंबर या तिमाहीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ४८ हजार कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदविला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या परिस्थितीत सुधारणा होत असून सरकारने केलेल्या उपयोजनांमुळे बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होत असल्याचे समोर आले आहे. याचबरोबर चालू आथिर्क वर्षांत बँकांची आर्थिक कामगिरी सुधारली असून बँकांनी ४८,८७४ कोटींचा निव्वळ नफा मिळविला आहे, असे ते म्हणाले.
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी निराशाजनक
गेल्या वर्षी (२०२०-२१) सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी ३१,८२० कोटी रुपयांच्या नफ्याची नोंद केली होती. मात्र २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीत सलग पाच वर्षे सार्वजनिक क्षेत्रातील काही बँकांना तोटा झाल्याने एकूण सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कामगिरी निराशाजनक राहिली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी २०१७-१८ मध्ये सर्वाधिक ८५,३७० कोटी रुपयांचा निव्वळ तोटय़ाची नोंद केली होती.
दरम्यान, सन २००९-१० ते २०१४-१५ या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नफा नोंदविला होता. ३१ मार्च २०१० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखांची संख्या ५८,६५० शाखांवरून वाढून ८४,६९४ पर्यंत वाढली आहे.