Join us

सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाही; सोशल मीडियातला 'तो' दावा खोटा: आरबीआय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 8:18 PM

पीएमसी बँकेप्रमाणेच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका देखील कायमस्वरुपी बंद होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबई: पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेवर (पीएमसी बँक) रिझर्व बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले असून, बँकेचे सर्व व्यवहार बंद करण्यात आलॆ आहेत. पीएमसी बँक डबघाईला आल्याने रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. मात्र पीएमसी बँकेप्रमाणेच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका देखील कायमस्वरुपी बंद होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार असल्याचा मेसेज चुकीचा असून  सार्वजनिक क्षेत्रातील बँक बंद होणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. 

आरबीआयकडून सार्वजनिक क्षेत्रातील ९ बँका कायमस्वरुपी बंद होणार असल्याचा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्रा बँक, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, देना बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश असल्याचे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर या संबंधित खातेदारांनी पैसे काढून घ्यावे असा मेसेजमध्ये लिहिण्यात आले आहे. 

अर्थसचिव राजीव कुमार यांनी ट्विट करत सांगितले की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज चुकीचा असून सार्वजनिक क्षेत्रातील बँक बंद होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सार्वजनिक बँकांना बळकटी देण्याचे काम आरबीआय करत आहे. त्यामुळे बँका बंद होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. 

दरम्यान, आरबीआय ने पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले असल्याचे सांगण्यात येत आहे. आज सकाळी बँकेमार्फत ग्राहकांना याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळेचिंतीत झालेले  ग्राहक बँकेत मोठ्या संख्येने जमले असून, त्यांचे कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू आहेत.  

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकबँकसोशल मीडिया