नवी दिल्ली : हरित क्रांतीतून धान्योत्पादनात स्वावलंबी होणारा भारत आता फलोत्पादनात जगातील सर्वात मोठा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. फळांसोबत भाजीपाला पिकविण्यात भारताने मुसंडी मारली आहे. फलोत्पादनातील लक्षणीय वाढीतून देशांतर्गत मागणीही वाढल्याचे संकेत मिळतात. फलोत्पादनात भारताने चीननंतर दुसरा क्रमांक पटकावला असला, तरी फलोत्पादन वाढविण्यास आणखी खूप वाव आहे.
कृषी मंत्रालयाच्या फलोत्पादन सांख्यिकी दृष्टिक्षेप-२०१५च्या अहवालानुसार भारताच्या फलोत्पादन यशाचे गमक लहान शहरे आणि जिल्ह्यात दडले आहे. या आकडेवारीनुसार २०१२-१३ मध्ये चित्तूर, अनंतपूर (आंध्र प्रदेश), बारामुल्ला (जम्मू-काश्मीर), नलगोंडा (तेलंगणा) सागर, शाहडोल (मध्यप्रदेश), दार्जिलिंग (प. बंगाल) आणि महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि सांगलीने भारताच्या फळफळावळ नकाशावर स्थान मिळविले आहे.
फलोत्पादन राज्यनिहाय यादीत महाराष्ट्र अग्रणी असून त्यानंतर आंध्र प्रदेश, गुजरात, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. आंबे, सफरचंद, केळी आणि लिंबूवर्गीय फळे आणि पेरू या फळांच्या भरघोस उत्पादनामुळे भारताला हा गौरव मिळविता आला.
निर्यातीत द्राक्ष अव्वल स्थानी असून २०१४-१५ मध्ये १०७.३ हजार टन द्राक्ष भारतातून निर्यात झाली.
त्याचे निर्यात मूल्य १,०८५ कोटी रुपये आहे.
उत्पादकता कमी असली तरी भारताने चीन आणि स्पेनपेक्षा चांगली कामगिरी केली आहे.
फळ लागवड क्षेत्र वाढल्याने उत्पादनात भरघोस वाढ झाली आहे. गेल्या एक दशकात फळ लागवड क्षेत्र २.७ टक्क्यांनी वाढले, तर वार्षिक उत्पादन मात्र ७ टक्क्यांनी वाढले, असे आॅक्सफोर्ड विद्यापीठाच्या पुस्तिकेत नमूद करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)
पुणे, औरंगाबाद, जळगाव, सांगली देशाच्या फळ उत्पादन नकाशावर
पुणे, औरंगाबाद, जळगाव, सांगली देशाच्या फळ उत्पादन नकाशावर
By admin | Published: January 19, 2016 03:07 AM2016-01-19T03:07:32+5:302016-01-19T03:07:32+5:30