Join us  

१३ वर्षाची कायदेशीर लढाई अमेरिकन कंपनी हरली; पुण्याचा झाला बर्गर किंग, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 3:18 PM

बर्गर किंग हा जगभरातील प्रसिद्ध ब्रँड आहे. मात्र या कंपनीनं पुण्यातील एका कंपनीवर कोर्टात केलेला दावा फेटाळण्यात आलेला आहे

पुणे - बर्गर किंग हा जगातील प्रसिद्ध ब्रँड आहे. जगातील १०० देशात जवळपास १३ हजाराहून अधिक रेस्टॉरंट आहेत परंतु भारतात या कंपनीला एका अनोख्या समस्येला सामोरं जावं लागलं. पुणे शहरात बर्गर किंग (Burger King) नावानं खूप जुने आणि लोकप्रिय रेस्टॉरंट चालवले जात होते. त्यामुळे अमेरिकन कंपनी बर्गर किंगनं पुण्यातील या कंपनीवर त्यांच्या नावाचा वापर करण्याचा आरोप करत खटला दाखल केला. भारतात बर्गर किंगची ही कायदेशीर लढाई १३ वर्ष चालली आता कोर्टाचा निर्णय पुण्यातील कंपनीच्या बाजूने लागला आहे त्यामुळे अमेरिकन कंपनीला हा मोठा धक्का मानला जात आहे.

पुण्यातील व्यावसायिक न्यायालयात शहरातील कॅम्प परिसरातील रेस्टॉरंटच्या बाजूने निकाल लागला आहे. न्या. सुनील वेद पाठक यांनी १६ ऑगस्टला दिलेल्या आदेशात म्हटलंय की, अमेरिकन फास्ट फूड कंपनी बर्गर किंग कॉर्पोरेशनची याचिका फेटाळली जात आहे. अमेरिकन कंपनीने ट्रेडमार्कच्या उल्लंघनासह अनेक आरोप पुण्यातील  कंपनीवर लावले होते. पुण्यातील या रेस्टॉरंटला बॅगर किंग नावाचा वापर करण्यास मनाई करावी त्यासोबत आमच्या कंपनीला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी अमेरिकन कंपनीनं कोर्टात केली होती.

अनाहिता आणि शपूर इराणी चालवतात पुण्यातील बर्गर किंग

पुणे येथील बर्गर किंग रेस्टॉरंट अनाहिता आणि शपूर इराणी चालवतात. त्यांचे रेस्टॉरंट कॅम्प आणि कोरेगाव परिसरात आहे. जे खूप लोकप्रिय आहे. या प्रकरणी कोर्टाने सांगितले की, पुण्यातील बर्गर किंग १९९२-९३ सालापासून या नावाचा वापर करत आहे. अमेरिकन कंपनी याच्या खूप वर्षांनी भारतात आली. त्यांनी त्यांचे नाव भारतात त्यानंतर रजिस्टर केले. पुण्यातील कंपनी खूप आधीपासून बर्गर किंग नावाचा वापर करत आहे त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई केली जाऊ शकत नाही असं कोर्टाने स्पष्ट केले.

२०१४ साली भारतात आली अमेरिकन कंपनी बर्गर किंग

बर्गर किंगची स्थापना १९५४ साली झाली होती. त्याची सुरुवात जेम्स मॅकलमोर आणि डेविड एडगर्टन यांनी केली होती. या कंपनीचे १०० हून अधिक देशात १३ हजार रेस्टॉरंट आहेत. त्यातील ९७ टक्के रेस्टॉरंटचे मालक हीच कंपनी आहे. ही जगातील सर्वात दुसरी फास्ट फूड हॅमबर्गर कंपनी मानलं जाते. जवळपास ३०,३०० कंपनीचे कर्मचारी आहेत. कंपनीने आशियात पहिल्यांदा १९८२ साली एन्ट्री केली. मात्र २०१४ मध्ये ते भारतात आले. त्यांनी नवी दिल्ली, मुंबई, पुणे याठिकाणी कंपनीची सुरुवात केली.  

टॅग्स :न्यायालय