Lokmat Money > बिझनेस न्यूज > बँकिंग प्रक्रियेसह ऑडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र बॅँकेत झाला आर्थिक घोटाळा

बँकिंग प्रक्रियेसह ऑडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र बॅँकेत झाला आर्थिक घोटाळा

सत्तेच्या दुरुपयोगाने बँका अडचणीत कोणाच्या संगनमताने झाला गैरव्यवहार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 04:39 AM2019-10-17T04:39:18+5:302019-10-17T04:39:43+5:30

सत्तेच्या दुरुपयोगाने बँका अडचणीत कोणाच्या संगनमताने झाला गैरव्यवहार?

Punjab and Maharashtra Bank financial scam due to neglect of audit with banking process | बँकिंग प्रक्रियेसह ऑडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र बॅँकेत झाला आर्थिक घोटाळा

बँकिंग प्रक्रियेसह ऑडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र बॅँकेत झाला आर्थिक घोटाळा

- केतन गोरानिया
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेत (पीएमसी) आर्थिक घोटाळा झाला, म्हणून सहकार क्षेत्र वाईट आहे, असे होत नाही. हा विषय बँकेचा आहे. व्यवहार कसे होतात? यावर बँकेचे भवितव्य अवलंबून असते. पीएमसी बँकेबद्दल बोलायचे झाल्यास, रिझर्व्ह बँकेने रक्कम काढण्याची मर्यादा ४० हजार रुपयांवर आणली, तेव्हा ७० टक्के लोकांचे पैसे परत आले आहेत. घोटाळ्याबाबत सांगायचे झाल्यास, जितके काही माझ्या ऐकीवात आहे किंवा जसे समजते, त्यानुसार कोणाच्या संगनमताने हा घोटाळा झाला हे पाहणे महत्त्वाचे आहे. बँकेची परिस्थिती पाहता, दुसरा कोणता उपाय आहे, असे सध्या तरी दिसत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, चार प्रकारच्या आॅडिटकडे केलेल्या दुर्लक्षामुळे पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेत आर्थिक घोटाळा झाला, असे सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी सांगितले. ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत ठाकूर बोलत होते.


पीएमसी बँकेतील
घोटाळ्याबाबत काय मत आहे?

भागधारक बँकेचा वार्षिक अहवाल वाचत नाहीत. सभांना उपस्थिती लावत नाहीत. सभांना उपस्थिती दर्शविली, तर वस्तुस्थिती कळते. बँकेचे भागधारक, ठेवीदार आणि ग्राहक यांनी बँकेबाबत दक्ष राहिले पाहिजे. ग्राहकांचे बँकेवर कटाक्षाने लक्ष असले पाहिजे. संचालक मंडळावर आपण कोण निवडून देत आहोत, हे तपासले पाहिजे. पीएमसी बँक चांगली आहे. मात्र, संचालक मंडळावरील काही लोकांमुळे हा प्रकार घडला. बँकेचे आॅडिट नीट झाले पाहिजे. सचोटी पाहिजे, ती नसेल, तर घोटाळे होतच राहणार.


सहकारी बँकांच्या कामात
राजकीय हस्तक्षेप होत आहे?

व्यक्ती असो वा संस्था. व्यक्तीला मर्यादा असतात. संस्थेला मर्यादा नसतात. आजघडीला बँकांचे छोट्या आणि मोठ्या बँका असे विभाजन होत असून, आता सहकारी बँकांचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. कारण सहकारी बँकांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होत आहेत. परिणामी, राजकारण होते आणि बँका अडचणीत येतात. पीएमसी बँकेत आर्थिक घोटाळा झाला, म्हणून सहकार क्षेत्र वाईट आहे, असे होत नाही. व्यवहार कसे होतात? यावर बँकेचे भवितव्य अवलंबून असते. अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. लोकांची प्रगती होत असेल, तर सहकार क्षेत्र नक्कीच मदत करेल. मात्र, जर सहकार बुडाले, तर  देशात भांडवलशाही, सावकारी येईल.


सहकाराला राजकारणाचा
फटका बसत आहे का?

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बँक म्हणून सारस्वत बँकेची ओळख आहे. आता बँकांचे छोट्या आणि मोठ्या बँका असे विभाजन झाले आहे. सहकारी बँक नेहमी लोकांना संकटात मदत करते. सहकारी बँकांचे अस्तित्व राहिले पाहिजे. सहकारी बँकांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होता कामा नये. सहकारी बँकात राजकीय हस्तक्षेप होतात. गाव, जिल्हा स्तरावर राजकीय दबदबा असतो. सहकारात राजकारण होण्याची शक्यता असते. सत्तेचा दुरुपयोग झाला की, काही बँका अडचणीत येतात.


सहकार क्षेत्र बुडत आहे किंवा
दिवसागणिक त्यास आर्थिक
फटका बसत आहे का?

सहकार क्षेत्र हे मदत करणारे क्षेत्र आहे. सहकार क्षेत्राने मोठी क्रांती केली आहे. सहकार क्षेत्रात प्रॉफिट हा मोटिव्ह नसतो. येथे मदत करण्याची भावना असते, संधी असते. अमेरिकेत आजही सहकारी बँका तग धरून आहेत. कारण त्या तत्त्वावर चालतात. सहकार क्षेत्राचा मार्ग मोठा
आहे. प्रत्येक क्षेत्राचा दृष्टिकोन वेगळा असतो. अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे.


बँका डिजिटल होत आहेत;
याबद्दल काय सांगाल?

बँका बदलत राहतील. कारण बदल हा जगाचा नियम आहे. आमचे सत्तर टक्के व्यवहार हे डिजिटल होत आहेत. आता काही व्यवहार धनादेशाने होत आहेत. मात्र, काही काळानंतर हे व्यवहार बंद होऊन सर्व व्यवहार डिजिटल होतील. व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग नावाचा एक प्रकार आहे. भारतात एका खासगी म्हणजे कोटक बँकेने याचा वापर केला. त्यानंतर, सारस्वत बँकेने व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सुरू केले. आम्हाला अनेक जण विचारतात; हे कसे केले? आम्ही आमच्या कामात अग्रेसर आहोत. आपण स्वत:ला छोटे समजायचे नाही. काळानुसार तुम्ही तुमच्यात बदल केला, तर तुम्ही अग्रेसर होणार. बदलाकडे संधी म्हणून पाहिले, तर नक्कीच यश मिळेल.

देशाची अर्थव्यवस्था ढासळते आहे का?
आपण किंवा आपला देश आर्थिक क्षेत्रात एका वेगळ्या उंचीवर आहे. देशातील उद्याची पहाट सोनेरी आहे. आपल्या अर्थव्यवस्थेने ४० कोटी लोकांना दारिद्र्यरेषेवर आणले आहे. आपण हे पंधरा वर्षांत केले आहे. आपली धोरणे सकारात्मक पाहिजेत. रोजगार निर्मिती झाली पाहिजे, तरच प्रगती होईल.

Web Title: Punjab and Maharashtra Bank financial scam due to neglect of audit with banking process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.