नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. तसेच, देशातील विविध राज्य सरकारांकडून आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत केली जाते. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अनेक प्रकारची उपकरणे, बियाणांची गरज असते, ती खरेदी करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना भरघोस अनुदान देते.
बँकांनीही शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची प्रक्रिया सोपी केली आहे. यातच आता पंजाब नॅशनल बँकेने (PNB Bank) शेतकऱ्यांना मिस्ड कॉलवरच कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. पीएनबीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाच्या अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती दिली आहे. कर्जाच्या अर्जाबाबत बँकेने म्हटले की, कृषी कर्जासाठी अर्ज कसा करावा? याची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार आहे.
कसा करायचा अर्ज?पंजाब नॅशनल बँकेने देशातील शेतकऱ्यांसाठी कर्जाची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे. यामध्ये शेतकरी अतिशय सोप्या आणि माफक अटींवर अर्ज करून शेतीसाठी कर्ज घेऊ शकतात. 56070 या नंबरवर Loan लिहून SMS करायचा आहे. या व्यतिरिक्त 18001805555 किंवा 18001802222 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकता. याचबरोबर, नेटबँकिंगद्वारे देखील तुम्ही कृषी कर्जासाठी अर्ज करू शकता. यासाठी पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कृषी कर्जासाठी अर्ज करावा लागेल.
केंद्र सरकारची किसान सन्मान निधी योजनादरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सरकार शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देते. ही रक्कम तीन हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. याचबरोबर, कृषी सिंचन योजनेत शेतकऱ्यांना शेतीचा विस्तार, पाण्याची बचत आणि सिंचनाचे आधुनिक तंत्र आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या योजनेत ठिबक व फाऊंटन सिंचन तंत्रज्ञानावरही शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते. अधिक माहितीसाठी शेतकरी https://pmksy.gov.in/ अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.