नवी दिल्ली : घर खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पंजाब नॅशनल बँक (पीएनएबी) तुम्हाला स्वस्तात घर खरेदी करण्याची संधी देत आहे. बँक 29 नोव्हेंबर रोजी 13000 हून अधिक निवासी मालमत्तांचा लिलाव करणार आहेत. पीएनएबीने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. लिलावात केवळ निवासीच नाही तर व्यावसायिक मालमत्ता आणि शेतजमिनीचाही समावेश आहे.
उद्याच्या या लिलावात ग्राहकांना 13082 निवासी मालमत्ता, 2544 व्यावसायिक मालमत्ता, 1339 औद्योगिक मालमत्ता आणि 98 शेतजमिनींसाठी बोली लावता येणार आहे. जर तुम्हाला घर किंवा जमीन स्वस्तात खरेदी करायची असेल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असू शकते. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्ही https://ibapi.in/ ला भेट देऊ शकता.
दरम्यान, पीएनएबी प्रमाणेच देशातील इतर बँका देखील वेळोवेळी काही मालमत्तांचा लिलाव करतात. या अशा मालमत्ता आहेत, ज्यांना एनपीएच्या यादीत टाकण्यात आले आहे. याचा अर्थ असा की, ज्या व्यक्तीने या मालमत्तांवर कर्ज घेतले आहे. पण तो कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरला आहे आणि त्याच्याकडून कर्ज वसूल करता येणार नाही. अशा परिस्थितीत बँका या मालमत्ता जप्त करून लिलाव करतात. आता सहसा लिलावासाठी फक्त ई-लिलाव आयोजित केले जातात. घर, जमीन आणि वाहन इत्यादींचा लिलावात समावेश असू शकते. अनेक वेळा या लिलावात मालमत्ता बाजारापेक्षा चांगल्या किमतीत मिळतात.
या लिलावात कसा सहभाग घ्याल?हा एक ई-लिलाव आहे. त्यामुळे तुम्ही त्यात फक्त ऑनलाइनच भाग घेऊ शकाल. सर्वात आधी ibapi.in वर जा. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर करावा लागेल. वेबसाइट उघडताच तुम्हाला रजिस्टर टॅब पिवळ्या रंगात लिहिलेला दिसेल. यानंतर केवायसीशी संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील. त्याचे व्हेरिफिकेशन केले जाईल. व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यावर ऑनलाइन चलन भरले जाईल. त्यानंतरच तुम्ही ऑनलाइन बोली लावण्यास पात्र असाल.
लिलाव होणाऱ्या मालमत्ता एकाच ठिकाणी दिसतीलदरम्यान, बँकांनी जप्त केलेली सर्व मालमत्ता तुम्हाला ibapi.in वर लिलावात पाहायला मिळेल. हे पोर्टल इंडियन बँक्स असोसिएशनच्या पुढाकाराने बनवले आहे. येथे तुम्हाला लिलाव होणार्या मालमत्तेशी संबंधित माहिती मिळेल.