वॉशिंग्टन : एकीकडे मंदीची चर्चा सुरू असतानाच अमेरिकेत ब्लॅक फ्रायडेनिमित्त लोकांनी ९८० कोटी डॉलर्सची ऑनलाइन खरेदी करून नवा विक्रम प्रस्थापित केला. ब्लॅक फ्रायडेच्या आधी असलेल्या थँक्स गिव्हिंग डे निमित्त लोकांनी ५६० कोटी डॉलर्सची ऑनलाइन खरेदी केली. या दोन दिवसांत १५४० कोटी डॉलर्सची बंपर विक्री झाली आहे.
अमेरिकेसह काही पाश्चिमात्य देशांमध्ये थॅक्सगिव्हिंग डेच्या गुरुवारपासून सोमवारपर्यंतचा कालखंड खरेदीसाठी शुभ मानला जातो. महागाईच्या चिंतेमुळे अमेरिका सध्या अडचणींचा सामना करीत आहे. तरीही ग्राहकांनी या मुहूर्तावर विक्रमी खरेदी केली आहे. (वृत्तसंस्था)
७.५ टक्क्यांनी वाढ
- ॲडोब अनालिटिक्सच्या या एजन्सीच्या माहितीनुसार मागच्या वर्षी ब्लॅक फ्रायडेनिमित्त अमेरिकेत ९१२ कोटी डॉलर्सची खरेदी झाली.
- लोकांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, स्मार्ट होम इक्विपमेंट घेण्यास प्राधान्य दिले. यंदा विक्री ५.७ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात ७.५ टक्के वाढ झाली.
कधी सुरू झाली प्रथा?
१९५० च्या दशकात फिलाडेल्फियामध्ये ब्लॅक फ्रायडेची सुरुवात झाली. थॅक्सगिव्हिंगनंतर लोक खरेदीसाठी फिलाडेल्फियामध्ये मोठ्या प्रमाणावर जमू लागले. तेव्हापासून खरेदीची प्रथाच तिथे सुरू झाली. विक्रेतेही यासाठी जोरदार तयारी करू लागले. हळूहळू ही प्रथा संपूर्ण अमेरिकेत पसरली.