Pushpabanta Palace Indian Hotels: देशातील अनेक राजवाड्यांचं रूपांतर ५ आणि ७ स्टार हॉटेलमध्ये झालंय. पण आजही असे अनेक राजवाडे आहेत, जे या गोष्टीची वाट पाहत आहेत. अशाच एका १०० वर्षे जुन्या राजवाड्याचं चित्र आता बदलणार असून येत्या तीन वर्षांत त्याचं पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर होणार आहे. ज्याची जबाबदारी टाटा समूहाची हॉटेल कंपनी आयएचसीएलनं म्हणजेच इंडियन हॉटेल कंपनी लिमिडेटनं घेतली आहे. ज्यावर कंपनी २५० कोटी रुपये खर्च करणार आहे. हा राजवाडा कोणता आणि कुठे आहे हे जाणून घेऊ.
त्रिपुरा सरकारसोबत करार
त्रिपुरा सरकारने १०० वर्षे जुन्या पुष्पबंता पॅलेसचे जागतिक दर्जाच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये रूपांतर करण्यासाठी इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) सोबत शुक्रवारी करार केला. राज्याचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्याची माहिती दिली. पुष्पबंता पॅलेस येथे जागतिक दर्जाचे पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी सरकार ताज समूहाच्या मालकीच्या आयएचसीएल या संस्थेसोबत पुढे जात आहोत, अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. धुलिवंदनाच्या मुहूर्तावर हा करार करण्यात आल्यानं राज्यासाठी हा ऐतिहासिक दिवस असल्याचे ते म्हणाले.
२५० कोटी होणार खर्च
जागतिक दर्जाचं पंचतारांकित हॉटेल विकसित करण्यासाठी आयएचसीएलनं प्रथमच राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे, असं साहा यांनी सांगितलं. ताज पुष्पबंता पॅलेस असं या हॉटेलचे नाव असेल आणि येत्या तीन वर्षांत २५० कोटी रुपये खर्चून ताज ग्रुप या हॉटेलचा विकास करेल, असंही ते म्हणाले. मात्र, ताज ग्रुपकडून अद्याप कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही. टाटा समूहानं राजस्थानमधील हैद्राबाद आणि उदयपूर येथील राजवाड्यांचे हॉटेलमध्ये रूपांतर केलं आहे आणि ते यशस्वीरीत्या कामही करत आहेत.