Join us

पी व्ही सिंधूची धोनीवर मात

By admin | Published: March 07, 2017 10:56 AM

जाहिरात क्षेत्रात पी व्ही सिंधूने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मात केली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 7 - क्रिकेटवेड्या भारतात बॅडमिंटन खेळत प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या पी व्ही सिंधूने जाहिरातीच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. जाहिरात क्षेत्रात पी व्ही सिंधूने भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर मात केली आहे. पी व्ही सिंधूला धोनीपेक्षा जास्त मानधन मिळत आहे. गतवर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी पी व्ही सिंधू जाहिरातींमधून मानधन मिळवणा-यांच्या यादीत फक्त कर्णधार विराट कोहलीच्या मागे आहे. पी व्ही सिंधूची ब्रॅण्ड व्हॅल्यू सायना नेहवाल आणि सानिया मिर्झापेक्षाही जास्त झाली आहे. 
 
'सिंधू सध्या महिला खेळाडू आणि नॉन क्रिकेटर्स, दोघांच्याही पुढे आहे. ब्रॅण्डसोबत असलेला तिचा करार जास्तीत जास्त काळ राहावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असून, याचा तिच्या खेळावर परिणाम होऊ नये यासाठी प्रयत्न करत असल्याचं', बेसलाइन वेंचर्सचे व्यवस्थापकीय संचालक तुहिन मिश्रा यांनी सांगितलं आहे. 
 
मिश्रा यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सिंधूची सध्या जाहिरात मानधन एक ते सव्वा कोटी आहे. मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहलीला ब्रॅण्ड्सकडून दिवसाला दोन कोटी मिळतात. धोनी खेळात अग्रेसर असताना घेत असलेल्या मानधनापेक्षा ही रक्कम जास्त आहे. 
 
सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकत भारताची मान उंचावली आहे. रौप्य पदक जिंकणारी ती पहिलीच महिला खेळाडू आहे. ऑलिम्पिकमधील तिच्या यशानंतर मानधनाची रक्कम 15-25 लाखांहून एक कोटी करण्यात आली होती. सिंधूने गेल्या पाच महिन्याच जवळपास 30 कोटींचे करार केले आहेत. हे करार बेसलाइन वेंचर्सकडून करण्यात आलेल्या तीन वर्षांच्या कराराचा भाग आहे. ज्यासाठी तिला 50 कोटींची निर्धारित रक्कम मिळणार आहे.