Join us

PVR INOX ला लॉटरी! विलिनीकरण घोषणेनंतर शेअरची रेकॉर्ड ब्रेक झेप; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 9:47 AM

PVR आणि INOX च्या शेअर्सनी ५२ आठवड्यातील उच्चांक गाठला असून, गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा मोठा परिणाम अनेक बड्या कंपन्यांवर, क्षेत्रावर पाहायला मिळाले. अनेक महिन्यांपासून चित्रपट प्रदर्शन बंद असल्यामुळे याचा मोठा परिणाम सिनेमागृहांवर झाल्याचे दिसत आहे. यातील दोन बड्या कंपन्या असलेल्या PVR आणि INOX यांचे विलिनीकरण (PVR-INOX Merger) होणार असल्याची घोषणा करण्यात आली. यानंतर या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सनी उच्चांकी झेप घेत एका दिवसांत १७ टक्क्यांची घसघशीत वाढ नोंदवली आहे. 

देशातील सिनेमागृहांची साखळी चालविणाऱ्या दोन सर्वांत मोठ्या कंपन्या पीव्हीआर लिमिटेड आणि आयनॉक्स लीझर लिमिटेड यांनी विलीन होण्याचा निर्णय, एकूण १,५०० पडद्यांचे जाळे असणारी या क्षेत्रातील महाकाय कंपनीची वाट मोकळी करून दिली आहे. दोन्ही कंपन्यांच्या समभागांनी वरचे सर्किट गाठावे इतकी गुंतवणूकदारांकडून खरेदी पाठबळ मिळविले. विलीनीकरणानंतर या दोन्ही कंपन्यांची एकत्रित नवी कंपनी स्थापन केली जाईल, तिचे नाव पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड असणार आहे.

दोन्ही कंपन्यांच्या शेअरची उच्चांकी झेप

आयनॉक्स लीझरचा शेअर १९.९९ टक्के उसळी घेतली आणि ५६३.६० रुपये असे ५२ सप्ताहांतील उच्चांकी मूल्य त्याने गाठले. दिवसाची अखेर त्याने ११.३३ टक्के वाढीसह ५२२.९० या पातळीवर केली. बरोबरीनेच ९.९९ टक्के उसळी घेत पीव्हीआरनेही २,०१०.३५ रुपये अशा ५२ सप्ताहांतील उच्चांकपद गाठले. सोमवारचा व्यवहार थंडावताना  हा समभाग ३.०६ टक्के वाढीसह १,८३३ रुपयांवर स्थिरावला. करारानुसार, आयनॉक्सचे पीव्हीआरमध्ये विलीनीकरण होत असून, आयनॉक्सच्या भागधारकांना त्यांच्याकडील प्रत्येक १० समभागांमागे, पीव्हीआरचे तीन समभाग हे विलीनीकरण मार्गी लागल्यावर मिळू शकतील.

असे होतील बदल

पीव्हीआरचे विद्यमान अध्यक्ष अनिल बिजली कंपनीचे नवीन अध्यक्ष असतील, तर संजीव कुमार यांची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आयनॉक्स समूहाचे चेअरमन पवन कुमार जैन यांना नवीन कंपनीच्या बिगर कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष केले जाणार असून, आयनॉक्सचे सिद्धार्थ जैन यांना नॉन-एक्झिक्युटिव्ह नॉन इंडिपेंडंट डायरेक्टर बनवले जाईल.

दरम्यान, पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड ही दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर तयार झालेली नवीन कंपनी देशातील सर्वांत मोठी मल्टिप्लेक्स कंपनी बनेल. सध्या पीव्हीआरकडे ७३ शहरांमध्ये १८१ ठिकाणी ८७१ स्क्रीन आहेत, तर आयनॉक्सकडे देशातील ७२ शहरांमध्ये १६० ठिकाणी ६७५ स्क्रीन आहेत. विलीनीकरणानंतर दोन्ही कंपन्यांच्या स्क्रीन्सची संख्या १५०० हून अधिक स्क्रीनवर जाईल. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक