देशभरात सिनेमागृहांची साखळी चालवणाऱ्या अग्रगण्य कंपन्या म्हणजे पीव्हीआर आणि आयनॉक्स. सध्या या कंपन्यांविषयी एक मोठा निर्णय समोर आला आहे. पीव्हीआर आयनॉक्सने (PVR INOX) देशभरातील जवळपास 50 थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यामागे कंपनीने सांगितलेलं कारण थक्क करणारं आहे.
पीव्हीआर आणि आयनॉक्स या कंपनीला मे महिन्याच्या तिमाहीत मोठा तोटा झाला आहे. त्यामुळे त्यांनी 50 थिएटर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच त्यांनी एक आकडेवारीदेखील जाहीर केली आहे. त्यानुसार, नफ्यापेक्षा आम्हाला तोटा जास्त होत असल्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय आम्ही घेत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयानुसार, येत्या 6 महिन्यात पीव्हीआर आयनॉक्सचे 50 थिएटर्स बंद होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीव्हीआर आयनॉक्सला चौथ्या तिमाहीमध्ये 333 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचं सांगण्यात येतं. डिसेंबरच्या तिमाहीमध्ये कंपनीला 16 कोटी रुपयांचा फायदा झाला होता. तर, एक वर्षापूर्वी मार्चच्या तिमाहीमध्ये कंपनीला हाच फायदा 105 कोटी रुपयांचा झाला होता. इतकंच नाही तर जानेवारी ते मार्च दरम्यान, 30.5 मिलियन प्रेक्षकांनी चित्रपट पाहण्यासाठी थिएटर्समध्ये हजेरी लावली होती.
नेमक्या किती स्क्रीन सुरु राहणार?
कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्षामध्ये एकूण 168 नव्या स्क्रिन्स सुरु राहणार आहेत. ज्यात पीव्हीआरत्या 97 आणि आयनॉक्सच्या 71 स्क्रिन्सचा समावेश असेल.