Quant Mutual Fund : क्वांट म्युच्युअल फंडातील (Quant Mutual Fund) कथित फ्रन्ट रनिंग प्रकरणी भांडवली बाजार नियामक सेबीकडून (SEBI) चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे लाखो गुंतवणूकदारांच्या मनात भीती निर्माण झालीये. यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पॅनिक सेलिंगचं वातावरण तयार होत आहे. या फंडातील गुंतवणूकदार आता प्रतीक्षा करण्याच्या मनःस्थितीत नाहीत. ते त्यांच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्सना लवकरात लवकर रिडीम करण्याची विनंती करत आहेत. याचा परिणाम फंडाच्या नेट असेट व्हॅल्यूवर किंवा एनएव्हीवर झाला आहे.
किती झाली घसरण?
सोमवारी सेबीच्या कारवाईनंतर फंडाच्या एनएव्हीमध्ये (NAV) घसरण दिसून आली. क्वांट पीएसयू फंडांमध्ये १.०९ टक्क्यांपर्यंत घट दिसून आली. दरम्यान, स्मॉल कॅप आणि मिड कॅप फंडांच्या एनएव्हीमध्ये अनुक्रमे ०.६६ टक्के आणि ०.९४ टक्के घट दिसून आली. क्वांट अॅक्टिव्ह फंडाच्या एनएव्हीमध्ये सोमवारी ०.६९ टक्क्यांची घसरण झाली.
काय आहे असेट साईज?
मे २०२४ अखेरपर्यंत फंड हाऊसच्या दोन्ही योजनांची मालमत्ता १०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. ८० लाख फोलिओ आणि एयूएम ९३,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक एयूएमवाल्या या फंडात बहुतेक किरकोळ विक्रेते आहेत.
क्वांट म्युच्युअल फंडाची सुरुवात संदीप टंडन यांनी केली होती. या फंडाला सिक्युरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियानं (सेबी) २०१७ मध्ये परवाना दिला होता. हा देशातील सर्वात वेगानं वाढणारा म्युच्युअल फंड (Mutual Fund) आहे. रिपोर्ट्सनुसार, फंड हाऊसकडे सध्या ९०,००० कोटी रुपयांची मालमत्ता आहे. २०१९ मध्ये ती १०० कोटी रुपये होती. या वर्षी जानेवारीत कंपनीची मालमत्ता ५० हजार कोटीरुपयांच्या पुढे गेली होती. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये २६ स्कीम्स आणि ५४ लाख पोर्टफोलिओंचा समावेश होता.
फ्रन्ट रनिंग म्हणजे काय?
भांडवली बाजारात काम करणाऱ्या लोकांच्या मते, फ्रन्ट रनिंग अॅक्टिव्हिटी त्याला म्हणतात, जेव्हा एखादा ब्रोकर किंवा गुंतवणूकदार कोणत्या ट्रेडमध्ये सहभागी होतो, कारण त्याला पहिल्यापासून त्या कंपनीची मोठी डील होणार आहे आणि त्यामुळे शेअर्सचे भाव वाढू शकतात याची माहिती असते.
फ्रन्ट रनिंगला फॉरवर्ड ट्रेडिंग किंवा टेलगेटिंग असंही म्हणतात. जर एखाद्या स्टॉक ब्रोकरला किंवा गुंतवणूकदाराला कंपनी मोठी डील करणार याची माहिती मिळाली, तर ते बरेच शेअर्स अगोदर खरेदी करतात आणि डील जाहीर झाल्यानंतर, स्टॉकची किंमत वाढल्यावर ते विकून मोठा नफा कमावतात.
जेव्हा एखादा अॅनालिस्ट किंवा ब्रोकर वैयक्तिक खात्यातून शेअर खरेदी करतो किंवा विकतो आणि नंतर तो शेअर खरेदी किंवा विक्री करण्याबद्दल त्याच्या क्लायंटला सल्ला अथवा माहिती देतो तेव्हादेखील फ्रन्ट रनिंग देखील होऊ शकते.