मुंबई : काही बड्या कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्याचा परिणाम होऊन भारतीय शेअर बाजारांत शुक्रवारी सलग पाचव्या दिवशी घसरण झाली. १८१ अंकांनी खाली आलेला मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स २६,६५६.८३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सचा हा एक महिन्याचा नीचांक आहे.आयटीसी आणि एलअँडटी यांसारख्या मान्यवर कंपन्यांच्या तिमाहीत निकाल कमजोर लागल्यामुळे बाजारांत घसरण झाली आहे. आयटीसीचा समभाग सर्वाधिक ४ टक्क्यांपेक्षा जास्त घसरला आहे. एलअँडटीचा समभागही ४.११ टक्क्यांनी घसरला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या डेरिव्हेटिव्ह करारांच्या समाप्तीच्या पार्श्वभूमीवर ३0 कंपन्यांचा सेन्सेक्स सकाळी १0५ अंकांनी तेजीसह उघडला होता. त्यानंतर तो आणखी वर चढल्याचेही दिसून आले. तथापि, काही ब्ल्यूचिप कंपन्यांचे समभाग घसरल्यामुळे बाजारातील तेजीला ब्रेक लागला. सत्राच्या अखेरीस १८१.३१ अंकांची अथवा 0.६८ टक्क्यांची घसरण नोंदवून सेन्सेक्स २६,६५६.८३ अंकांवर बंद झाला. १ आॅक्टोबरनंतरचा हा नीचांक ठरला. घसरणीचा फटका बसलेल्या बड्या कंपन्यांत वेदांता, एमअँडएम, भेल, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, गेल, बजाज आॅटो, कोल इंडिया, इन्फोसिस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, विप्रो आणि सिप्ला यांचा समावेश आहे. या प्रतिकूल वातावरणातही काही कंपन्यांचे समभाग वाढले. लाभधारक कंपन्यांत एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, डॉ. रेड्डी, अॅक्सिस बँक, सन फार्मा, हिंदाल्को आणि आरआयएल यांचा समावेश आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,१00 अंकांच्या खाली आला आहे. ४५.९५ अंकांची अथवा 0.५७ टक्क्यांची घसरण नोंदवून निफ्टी ८,0६५.८0 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्सला तिमाही निकालांचा फटका
By admin | Published: October 30, 2015 9:44 PM