नवी दिल्ली :
देशातील अनेक भागांत पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण झाली असून, अनेक राज्यांत पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून येत आहे. सरकार आणि तेल वितरण कंपन्यांनी पुरवठा सामान्य असल्याचा दावा केला असला तरीही पुरवठा होत नसल्याने अनेक पेट्रोलपंप बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, गुजरात आणि मध्य प्रदेश यांसह अन्य काही राज्यांतील पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत. भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या तेल वितरण कंपन्यांनी पुरवठा घटविल्याचा दावा डीलरांनी केला आहे. अनेक ठिकाणी पेट्राेल पंपावर पेट्राेल मिळविण्यासाठी नागरिक रात्रभर रांगा लावत आहेत.
पेट्रोलियम मंत्रालय काय म्हणते?
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक यासारख्या काही राज्यांत विशिष्ट ठिकाणी शेतीशी निगडित इंधन मागणी वाढली आहे. मात्र, देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. देशात पुरेसा इंधन साठा आहे. मागणीनुसार पुरवठा वाढविण्यात येईल. पंपचालक आता रात्र पाळीतही काम करतील.
विक्रीवाढीचा परिणाम
तेल उद्योगाकडील डाटानुसार, २०२१ च्या तुलनेत जून २०२२ मध्ये पेट्रोल विक्री ५४%नी, तर डिझेल विक्री ४८ टक्क्यांनी वाढली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे संचालक (विपणन) सतीशकुमार यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, आमच्या वितरण केंद्रांवर उपलब्धता सामान्य आहे. आमची विनंती आहे की, कोणीही घाबरू नये.
राज्यात काय स्थिती?
- राजस्थानात पेट्रोल-डिझेलची अघोषित कपात करण्यात आली आहे.
- १ हजारपेक्षा जास्त पेट्रोलपंप बंद असल्याचे आढळून आले.
- मध्य प्रदेशात तेल कंपन्यांनी इंधन पुरवठा ४०% कमी केला आहे.
- पुरवठा वाढविण्याची सरकारकडे मागणी. महाराष्ट्र, गुजरात राज्यासह अनेक शहरांत पेट्रोल वाहनांच्या रांगा
- पंजाबच्या काही भागांतील ५० टक्के पेट्रोल पंप बंद
- हिमाचल प्रदेशात तेल कंपन्यांकडून तीन दिवसांआड पुरवठा
- इंधन टंचाईमुळे उत्तराखंडमध्येही वाहनांच्या रांगा