Quick Commerce Job : क्विक कॉमर्स सेक्टरमध्ये सध्या मोठ्याप्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. क्विक कॉमर्सच्या जलद वाढीसह, शारीरिक श्रम करणाऱ्या कुशल आणि अर्ध-कुशल (ब्लू-कॉलर) कामगारांची गरज मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. एका सर्वेक्षणातून हे समोर आले आहे. नोकरी संबंधी प्लॅटफॉर्म 'इंडीड' नुसार, २०२७ पर्यंत भारतात २४ लाख नोकऱ्या निर्माण होतील.
इंडीड इंडिया सेल्स हेड शशी कुमार यांनी पीटीआयशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, सणासुदीच्या काळात खरेदी आणि ई-कॉमर्सची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी क्विक कॉमर्स कंपन्यांनी गेल्या तिमाहीत ४०,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना नियुक्त केले होते. भारतातील क्विक कॉमर्स इंडस्ट्री वेगाने वाढीच्या मार्गावर आहे आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी ब्लू-कॉलर कामगारांच्या नियुक्तीत आम्हाला लक्षणीय बदल दिसून येत आहेत, असे शशी कुमार यांनी सांगितले.
जसजसे उद्योग विस्तारत आहे, तसतसे कुशल आणि अर्ध-कुशल कामगारांची संख्या वाढत आहे, ज्यामुळे भरती अधिक स्पर्धात्मक होत आहे, असे शशी कुमार म्हणाले. तसेच, नियोक्ते वाढत्या प्रमाणात अशा प्रतिभावान लोकांचा शोध घेत आहेत, जे वेगवान, तंत्रज्ञान-संचालित वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात. दरम्यान,'ब्लू-कॉलर' नोकऱ्या म्हणजे अशा व्यवसायांशी संबंधीत आहेत, ज्यामद्ये शारीरिक श्रम किंवा कुशल व्यवसायांचा समावेश आहे. या नोकरीसाठी अनेकदा औपचारिक शिक्षणाऐवजी शारीरिक श्रम आणि व्यावहारिक प्रशिक्षण आणि अनुभव आवश्यक असतो.
इंडीडने केलेल्या सर्वेक्षणानुसार, डिलिव्हरी ड्रायव्हर्स आणि रिटेल कर्मचाऱ्यांसह या पदांसाठी सरासरी मासिक मूळ वेतन जवळपसा २२,६०० रुपये आहे. तसेच, भारताला विविध उद्योगांमध्ये २४ लाखांहून अधिक ब्लू-कॉलर कामगारांची आवश्यकता भासणार आहे, असे सर्वेक्षणात आढळून आले आहे. यापैकी जास्तीत जास्त पाच लाख नोकऱ्या फक्त 'क्विक कॉमर्स' क्षेत्रात निर्माण होण्याची शक्यता आहे.