आयआयटीमधून शिक्षण घेणं आणि नंतर त्यानंतर अमेरिकेत नोकरी मिळवणं सोपं नाही. पण नितीन सलुजा यांनी एक दिवस आपल्या अमेरिकेतील लाखोंच्या पॅकेजच्या नोकरीचा राजीनामा दिला. इतकंच नाही तर इतक्या मोठ्या फर्ममधून नोकरी सोडल्यानंतर नितीन यांनी भारतात येऊन चहाचं दुकान सुरू केलं. सद्यस्थितीत नितीन यांनी चहा विकून २००० कोटी रुपयांची स्वतःची फर्म उभारली आहे.
'मेरी वाली चाय' या स्लोगनसह चायोस देशभरात प्रसिद्ध झालंय आणि याचे फाऊंडर आहेत ते म्हणजे नितीन सलूजा. नितीन सलुजा हे एका व्यापारी कुटुंबातूनच येतात. त्यांनी आयआयटी मुंबईतून मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील एका मोठ्या कंपनीत मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून काम केलं. कंपनीत पाच वर्ष काम केल्यानंतर नितीनने अचानक लाखोंच्या पॅकेजच्या या नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेत ते भारतात परतले.
कशी आली कल्पना?
यानंतर त्यांनी भारतात येऊन स्टार्टअप सुरू करण्याचा निर्णय घेतला. नितीन यांनी चहाच्या संदर्भातील एक किस्साही सांगितला. जेव्हा ते अमेरिकेत होते, तेव्हा त्या ठिकाणी चहा पिणं हा किती कठीण टास्क आहे हे समजलं. भारतात चहाप्रेमी अनेक आहेत, पण चहाचा कॅफे नसल्याचं लक्षात आलं. म्हणूनच त्यांनी 'मेरी वाली चाय' लोकांना देण्यासाठी चायोसची सुरूवात केल्याचं म्हटलं.
मित्राचीही साथ
नितीन यांनी हे काम एकट्यानं नाही तर मित्र राघव वर्मा यांच्यासोबत सुरू केलं. नितीन यांनी सुरुवातीच्या काळात त्यांच्या कॅफेमध्ये चहा बनवला आणि सर्व्ह केला. 'चायोस'ची सुरूवात २०१२ मध्ये झाली. नितीन सलुजा कंपनीच्या प्रोडक्ट डिझाइन आणि डिस्ट्रिब्युशन नेटवर्कचे प्रमुख बनले, तर राघव यांनी बिझनेस, डेव्हलपमेंट आणि जाहिरातींची जबाबदारी घेतली.
२००० कोटींची कंपनी
त्यांच्या मेहनतीचं फळ मिळाले आणि पहिल्याच वर्षी त्यांच्या कंपनी ३० टक्क्यांची वाढ दिसून आली. २०१२ मध्ये कंपनीचं उत्पन्न ५२ कोटी होतं, तर २०२० मध्ये कंपनीनं १०० कोटींचा व्यवसाय केला. दुसरीकडे, कोविड नंतर, पुन्हा एकदा लोकांची वर्दळ वाढली. मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार २००२ मध्ये कंपनीचे मूल्यांकन सुमारे २४०-२५० मिलियन डॉलर्स होतं, म्हणजेच भारतीय रुपयानुसार ते 2051 कोटी रुपयांच्य जवळपास होतं. सध्या त्यांची २०० आऊटलेट्स असून २००० चायोस कॅफे उघडण्याची कंपनीची योजना आहे.