Join us

राज्यात रबीचा पेरा वाढणार!

By admin | Published: September 24, 2015 11:58 PM

राज्यात यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे; परंतु परतीच्या पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून

अकोला : राज्यात यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण घटले आहे; परंतु परतीच्या पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, रबी हंगामासाठी मशागतीला वेग आला आहे. कृषी विभागानेही यावर्षी राज्यात ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक रबी हंगामाचे नियोजन केले आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा आहे.२०१३-१४ मध्ये राज्यात अतिवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रबी हंगामाला झाला होता. त्यामुळे राज्यात शेतकऱ्यांनी ६० लाख हेक्टरच्या वर रबी पिकांची पेरणी केली होती; मात्र २०१४-१५ मध्ये पावसाने पाठ फिरवल्याने रबी हंगाम कोरडा गेला. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली; परंतु परतीच्या पावसाने पंधरा दिवस बऱ्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी रबी हंगामासाठी पोषक वातावरण तयार झाले असल्याने कृषी विभागाने यावर्षी रबी हंगामातील पीक पेरणीचे उद्दिष्ट वाढवले आहे. या विभागात खरीप हंगामातील ३२ लाख हेक्टरपैकी १७ लाख हेक्टरपर्यंत सोयाबीनची पेरणी झाली आहे.सोयाबीनच्या क्षेत्रावर शेतकरी रबी हंगामातील पिके घेतात. यासाठी जमिनीत भरपूर ओलाव्याची नितांत गरज असते. म्हणूनच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला रबी पिकांच्या पेरणीसाठी परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.दरम्यान, यावर्षी कृषी विभागाने रबीचे उद्दिष्ट वाढवले असून, अमरावती विभागासाठी जवळपास ९ लाख ५७ हजार हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे विभागासाठी २२ लाख हेक्टर, औरंगाबाद विभाग ८ लाख ६० हजार हेक्टर, लातूर विभाग १२ लाख हेक्टर, कोल्हापूर विभाग ५ लाख हेक्टरवर, नागपूर विभाग ४ लाख १३ हजार हेक्टर, नाशिक विभाग ४ लाख १५ हजार हेक्टर, तर कोकणात ३४ लाख हेक्टर क्षेत्रावर रबी पेरणी केली जाणार आहे.