- सोपान पांढरीपांडे
नागपूर - अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्नस एडीएजी ग्रुपमधील आरकॉमने स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्याची विनंती केल्याने, त्यांचा नागपूरमधील राफेल आॅफसेट प्रकल्प रखडण्याची चर्चा आहे. आरकॉमने दिवाळखोरीचा अर्ज केल्यानंतर, गेल्या तीन दिवसांत रिलायन्स एडीएजीच्या चार प्रमुख कंपन्यांचे समभाग शेअर २० ते ५० टक्क्याने कोसळले.
आरकॉमचा शेअर ५० टक्क्यांनी कोसळून ५.५० रुपयांवर आला, तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचा ३२ टक्क्यांनी घटून १५३वर आला. रिलायन्स पॉवरमध्ये ३० टक्के तर रिलायन्स कॅपिटलमध्ये २० टक्के घसरण झाली. समूहाच्या या चार कंपन्यांकडे एकूण १,५०,००० कोटी कर्ज थकीत आहे. त्यापैकी आरकॉमकडे ४६,००० कोटी, रिलायन्स पॉवरकडे ३३,००० कोटी, रिलायन्स कॅपिटलकडे ३९,००० कोटी व रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे २७,००० कोटी कर्ज थकीत आहे. या कंपन्यांचा राखीव निधी ८२,००० कोटी, गुंतवणूक ५०,००० कोटी व इतर मालमत्ता १२,००० कोटी मिळून एकूण मालमत्ता मूल्य १,४०,००० कोटींच्या घरात आहे. समूहाचा एकूण नफा १८० कोटींचा असल्याने समूहाकडे ८,००० कोटी कर्ज थकीत राहण्याची शक्यता आहे.
रिलायन्सने फ्रान्सच्या द सॉल्ट एव्हिएशनच्या भागीदारीत राफेल विमानाचे ५० टक्के सुटे भाग
भारतात बनविण्याचे कंत्राट मिळाले आहे. नागपूरच्या मिहान-एसईझेडमध्ये हा प्रकल्प आहे. भविष्यात इंजिन सोडून राफेल विमानाचे सुटे भाग नागपूरला तयार होतील व जोडणी इथेच होईल, असे मिहान-एसईझेडचे मुख्य अभियंता एस. व्ही. चहांदे यांनी सांगितले.
पाच हजार कोटी आणणार कोठून?
राफेलच्या आॅफसेट कंत्राटसाठी ३०,००० कोटींचे सुटे भाग तयार करायचे असल्याने, त्यासाठी समूहाला किमान ५,००० कोटी उभे करणे
आवश्यक आहे. हा समूह ही रक्कम उभी करू शकेल का, हा लाखमोलाचा प्रश्न आहे.
मात्र, रिलायन्स डिफेन्स लिमिटेडचे सीईओ राजेश धिंगरा म्हणाले की, आरकॉमच्या दिवाळखोरीचा इतर कंपन्यांवर परिणाम होणार नाही. अधिक माहिती कंपनीचे जनसंपर्क अधिकारी दलजीत सिंह देतील, परंतु वारंवार प्रयत्न करूनही सिंह यांच्याशी संपर्क झाला नाही. एसएमएसची उत्तरे मिळाली नाहीत.
आरकॉमच्या दिवाळखोरीमुळे राफेल प्रकल्प रखडणार?
अनिल अंबानी यांच्या नेतृत्वातील रिलायन्नस एडीएजी ग्रुपमधील आरकॉमने स्वत:ला दिवाळखोर घोषित करण्याची विनंती केल्याने, त्यांचा नागपूरमधील राफेल आॅफसेट प्रकल्प रखडण्याची चर्चा आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 05:59 AM2019-02-07T05:59:15+5:302019-02-07T05:59:46+5:30