Lokmat Money > बिझनेस न्यूज > रघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे

रघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे

RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF)चे व्यवस्थापकीय संचालक होण्याची शक्यता आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 11:49 AM2019-07-22T11:49:00+5:302019-07-22T12:03:06+5:30

RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF)चे व्यवस्थापकीय संचालक होण्याची शक्यता आहे.

raghuram rajan ex rbi governor front runner imf chief christine lagarde resigns | रघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे

रघुराम राजन होऊ शकतात IMFचे नवे प्रमुख, शर्यतीत सर्वात पुढे

नवी दिल्लीः RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(IMF)चे व्यवस्थापकीय संचालक होण्याची शक्यता आहे. ब्रिटिश मीडियानुसार, राजन यांचं नाव या पदासाठी शर्यतीत सर्वात पुढे आहे. ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयानं या पदासाठी भारतीय व्यक्तीच्या नावाचा विचार करावा, अशी सूचना केली होती. त्यानुसार रघुराम राजन यांचं नाव चर्चेत आलं आहे. राजन यांच्याशिवाय बँक ऑफ इंग्लंडचे माजी गव्हर्नर मार्क कार्नी, डेव्हिड कॅमरून सरकारमध्ये चॅन्सलर राहिलेले जॉर्ज ओसबॉर्न आणि नेदरलँडचे माजी वित्त मंत्री जेरॉइन डिजस्सेलब्लोएम यांच्या नावांचीही चर्चा आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या क्रिस्टिन लेगार्ड यांनी गेल्या आठवड्यात राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतरही 12 सप्टेंबरपर्यंत ते कारभार सांभाळणार आहे. तत्पूर्वी रघुराम राजन हे बँक ऑफ इंग्लंडचे गव्हर्नर बनवण्याचीही चर्चा होती. परंतु राजन यांनी मी या पदासाठी अर्ज केलेला नसल्याचा दावा करत हे वृत्त फेटाळलं होतं. 

रघुराम राजन सर्वात मजबूत दावेदार
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखाचं पद युरोप आणि अमेरिकेच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलं जातं. राजन हे सध्या ‘शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये शिकवितात. ब्रिटनच्या परराष्ट्र प्रकरणातील समितीचे अध्यक्ष टीम टुगेनडत यांनी ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेरेमी हंट यांना पत्र लिहून रघुराम राजन यांना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख बनवण्याची मागणी केली आहे, असं वृत्त संडे टाइम्सनं दिलं आहे.  

कोण आहेत रघुराम राजन ?
रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23वे गव्हर्नर होते. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963ला भोपाळमध्ये झाला. 4 सप्टेंबर 2013ला डी. सुब्बाराव निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आरबीआयचा पदभार स्वीकारला होता. सप्टेंबर 2016पर्यंत ते या पदावर होते. तत्पूर्वी यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रमुख आर्थिक सल्लागाराचीही त्यांनी भूमिका बजावली होती.  राजन हे सध्या ‘शिकागो बूथ स्कूल ऑफ बिझनेस’मध्ये शिकवितात.

2003 ते 2006पर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते प्रमुख अर्थतज्ज्ञ आणि रिसर्च डायरेक्टर होते. भारताच्या वित्तीय सुधारणा योजना आयोगाच्या माध्यमातून नियुक्त करण्यात आलेल्या समितीचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. 1985मध्ये त्यांनी भारतीय प्रौद्योगिकी संस्था (IIT) दिल्लीतून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची डिग्री मिळवली होती. आयआयएम अहमदाबादमधून त्यांनी 1987मध्ये एमबीए केलं. मॅसाचुसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून 1991मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात पीएचडी मिळवली.

Web Title: raghuram rajan ex rbi governor front runner imf chief christine lagarde resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.