Join us

 नोटाबंदीच्या निर्णयाच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकारला बजावले होते - रघुराम राजन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2017 8:20 AM

नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या सुमारे 99 टक्के नोटा चलनात परत आल्याचे समोर आल्यानंतर नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. रिझ्रर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही या निर्णयावर टीका केली आहे. 

नवी दिल्ली, दि. 3 - नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या सुमारे 99 टक्के नोटा चलनात परत आल्याचे समोर आल्यानंतर नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. रिझ्रर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनीही या निर्णयावर टीका करताना  नोटाबंदीच्या संभाव्य धोक्यांबाबत सरकाला आधीच बजावले होते असे सांगितले आहे.  रघुराम राजन यांनी आपल्या पुढील आठवड्यात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकात या संदर्भातील आपले मत मांडले आहे. त्यात ते म्हणतात, मी नोटाबंदीच्या दीर्घकालीन फायद्यांवर पुढील काळातील नुकसान भारी पडण्याची शक्यता असल्याचा इशारा सरकारला दिला होता." काळा पैसा व्यवस्थेत आणण्यासाठी सरकारला अन्य उपाय सूचवले होते. असेही त्यांनी सांगितले.  फेब्रुवारी 2016 मध्ये आपण सरकारला तोंडी सल्ला दिला होता. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने सरकारला एक टाचण दिले होते ज्याता यासंदर्भात उचलण्यात येणारी आवश्यक पावले आणि त्याचा कार्यकाळ या संदर्भातील माहिती दिली होती. तसेच नोटाबंदी संदर्भात रिझर्व्ह बँकेशी संपर्क साधण्यात आला होता. पण आपल्या कार्यकाळात नोटाबंदीचा निर्णय घेण्याचा सल्ला देण्यात आला नव्हता, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाले आहे. 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यावेळी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र चलनातून बाद झालेल्या 99 टक्के नोटा बँकांत जमा झाल्याने या महत्त्वाकांक्षी निर्णयाला अपेक्षित यश मिळाले नाही.  रिझर्व्ह बँकेने नोटाबंदी संदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून, बंद करण्यात आलेल्या नोटांपैकी सुमारे ९९ टक्के नोटा नागरिकांनी बँकांत जमा केल्या आहेत. केवळ १ टक्का नोटा जमा झालेल्या नाहीत, असे या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार, बंद करण्यात आलेल्या ६,७00 दशलक्ष नोटांपैकी फक्त ८९ दशलक्ष नोटा रिझर्व्ह बँकेला परत मिळाल्या नाहीत. बंद नोटांच्या स्वरूपात चलनात असलेल्या १५.४४ लाख कोटींपैकी १५.२८ लाख कोटी रुपये रिझर्व्ह बँकेला परत मिळाले आहेत. १ हजार रुपयांच्या १.३ टक्के नोटा बँकांत जमा झालेल्या नाहीत. त्यांची किंमत ८.९ कोटी रुपये आहे.रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात नोटाबंदीची आकडेवारी जाहीर केली आहे. अहवालात म्हटले आहे की, यंदा नोटा छपाईवर ७,९६५ कोटी रुपये खर्च झाले. गेल्या वित्तवर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट आहे. गेल्या वित्तवर्षात हा आकडा ३,४२१ कोटी रुपये होता. सरकारी आकडेवारीनुसार २ हजार रुपयांच्या ३,२८५ दशलक्ष नोटा सध्या चलनात आहेत.

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकसरकारनरेंद्र मोदी