रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आर्थिक धोरणावर आणि कारभारावर सातत्याने टीका करत असतात. मात्र आता रघुराम राजन यांनी हल्लीच दिलेल्या एका मुलाखतीमधून केंद्रातील मोदी सरकारने बँकिंग सुधारणांसाठी आणलेल्या धोरणांची प्रशंसा केली आहे. तसेच देशातील बँकिंग व्यवस्थेमध्ये बॅड लोन वाढण्यासाठी यूपीए सरकारच्या काळातील भ्रष्टाचार हा कारणीभूत ठरला होता, असे सांगितले. यावेळी रघुराम राजन यांनी तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांचंही कौतुक केलं. अरुण जेटली यांनी एनपीएला पायबंद घालण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याची परवानगी मला दिली होती, अशी आठवणही राजन यांनी सांगितली.
द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीमध्ये रघुराम राजन यांनी सांगितले की, तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या कार्यकाळापासून बँकिंग व्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यावेळी अरुण जेटली यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा उल्लेख करताना राजन यांनी सांगितले की, जेव्हा मी त्यांना बॅड लोनच्या स्थितीबाबत सांगितलं आणि त्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांनी ठीक आहे, याबाबत पुढचं पाऊल उचला, असे सांगितले. दरम्यान, रघुराम राजन यांनी यावेळी यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारामुळे बँकांचा एनपीए कशा प्रकारे वाढला हेही सांगितले. तसेच कर्ज राईट ऑफ करून बँकांची स्थिती सुधारण्यासाठी मदत केल्याबद्दल केंद्रातील मोदी सरकारचं कौतुकही केलं.
राजन यांनी मुलाखतीत सांगितले की, अनेक प्रकल्पांना, जमीन आणि पर्यावरणासंदर्बातील परवानग्या मिळत नव्हत्या. त्यामुळे एनपीए हळूहळू वाढत गेला. २००८ च्या मंदीपूर्वी बँका मुक्तपणे कर्जांचं वाटप करायच्या. त्या चेकबूक घेऊन उद्योजकांच्या मागे मागे फिरायच्या. त्याचं कारण म्हणजे तेव्हा योजना वेळेत पूर्ण व्हायच्या आणि बँकांनाही पैसा मिळायचा. या नादात काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्याचं भान पाळलं जात नसे. मात्र मंदीनंतर परिस्थिती बदलली, असेही ते म्हणाले.