ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - भाजपच्या पाठिंब्याने खासदार म्हणून राज्यसभेवर निवडून गेल्यानंतर सुब्रमण्यम स्वामींनी सवयीप्रमाणे वादग्रस्त विधान करुन सरकारला अडचणीत आणले आहे. रघुराम राजन यांना गव्हर्नरपदावरुन काढून टाका ते देशासाठी योग्य व्यक्ती नाहीत असे स्वामींनी म्हटले आहे.
बुधवारी लंडनच्या केमब्रिज विद्यापीठात व्याख्यान देताना रघुराम राजन यांनी परदेशी बँकांनी भारतात शाखा उघडणे बंद केले आहे. भारताता शाखा सुरु करणे हा फायद्याचा व्यवहार नाही असे त्यांना वाटते असे विधान केले होते. या विधानांमुळे स्वामी यांनी रघुराम राजन यांच्यावर शाब्दीक हल्ला चढवल्याची शक्यता आहे.
आरबीआय गव्हर्नर देशासाठी योग्य व्यक्ती नाही असे माझे मत आहे. महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर वाढवण्याचे त्यांचे धोरण फसले आहे. त्यांच्या धोरणाचा देशावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. सर्व उद्योग कोसळले असून, परिणामी बेरोजगारी वाढत आहे माझ्या मते लवकरात लवकर त्यांना पदावरुन काढून टाकावे असे स्वामी यांनी म्हटले आहे.