नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर कोसळत असल्याचे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन यांनी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे होत असलेले अवमुल्यन हे चिंतेचा कारण नसल्याचे म्हटले आहे. मात्र मोदी सरकारने चालू खात्यातील तुटीवर अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचा सल्ला दिला आहे. 16 ऑगस्ट रोजी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य अधिक कोसळून एका डॉलरसाठी 70.32 रुपयांपर्यंत पोहोचले होते. मात्र शुक्रवारी रुपयाचा दर काहीसा वधारून 69.91 पर्यंत पोहोचला होता. भारताची वित्तीय तूट कमी झाली आहे. मात्र चालू खात्यामधील तूट वाढली आहे. त्यासाठी खनिज तेलाच्या वाढलेल्या किमती कारणीभूत आहेत, असे राजन म्हणाले. रुपयाच्या अवमूल्यनाबाबत राजन म्हणाले, रुपयाचे अवमूल्यन अद्याप तरी चिंताजनक स्थितीपर्यंत पोहोचलेले नाही. जागतिक बाजारात डॉलर मजबूत झाल्याने रुपयाची किंमत घसरली आहे." आता येणाऱ्या काळातील निवडणुकांचा विचार केल्यास भारत आणि ब्राझीलसारख्या देशांसमोर व्यापक प्रमाणावर स्थायित्व राखण्याचे आव्हान असेल, असेही त्यांनी सांगितले. सध्या भारताची अर्थव्यवस्था 7.5 टक्के दराने विकसित होत आहे. आता चालू खात्यातील तूट वाढणार नाही आणि गंगाजळीतील स्थिरता कायम राहील, याची काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिली आहे.
घसरता रुपया चिंतेचे कारण नाही, रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला दिला हा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 10:21 PM