Join us

नवीन ऑर्डर मिळताच रॉकेट बनला 'हा' रेल्वे शेअर, ४ वर्षांत २९००% वधारला; मिळताहेत मोठ्या ऑर्डर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:36 AM

Rail Vikas Nigam Limited Share Price: बुधवारी मुंबई शेअर बाजारात कामकाजादरम्यान रेल्वे कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून ५९८ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ २ नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. पाहा कोणता आहे हा शेअर.

Rail Vikas Nigam Limited Share Price : बुधवारी रेल विकास निगम लिमिटेडच्या शेअरमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली. बुधवारी मुंबई शेअर बाजारात कामकाजादरम्यान रेल्वे कंपनीचा शेअर ९ टक्क्यांनी वधारून ५९८ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या शेअर्समध्ये ही वाढ २ नवीन ऑर्डर मिळाल्यामुळे झाली आहे. 

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि दक्षिण पूर्व रेल्वेकडून रेल विकास निगम लिमिटेडला हे नवीन ऑर्डर्स मिळाल्या आहेत. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांकी स्तर ६२० रुपये आहे. तर, रेल विकास निगमच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ११७.३५ रुपये आहे.

काय आहेत ऑर्डर डिटेल्स?

रेल विकास निगम लिमिटेडला महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड/नागपूर मेट्रोकडून १८७.३४ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. ६ एलिव्हेटेड मेट्रो स्थानकं बांधण्याच्या ऑर्डर मिळाल्या आहेत. ही ऑर्डर ३० महिन्यांत पूर्ण करायची आहे. याशिवाय दक्षिण पूर्व रेल्वेकडून रेल विकास निगम लिमिटेडला २०२.८७ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. कंपनीला ही ऑर्डर १८ महिन्यांत पूर्ण करायची आहे.

गेल्या ४ वर्षात रेल विकास निगम लिमिटेडचे शेअर्स २९०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत. १० जुलै २०२० रोजी रेल विकास निगमचा शेअर १९.६५ रुपयांवर होता. बुधवारी १० जुलै २०२४ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर ५९८ रुपयांवर पोहोचला. जर एखाद्या व्यक्तीनं चार वर्षांपूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि आपली गुंतवणूक कायम ठेवली असती तर या शेअर्सची किंमत सध्या ३०.४३ लाख रुपये झाली असती.

वर्षभरात ३८७ टक्क्यांची वाढ 

रेल्वे विकास निगम लिमिटेडचे शेअर्स वर्षभरात ३८७ टक्क्यांनी वधारले आहेत. १० जुलै २०२३ रोजी रेल्वे कंपनीचा शेअर १२२.२५ रुपयांवर होता. १० जुलै २०२४ रोजी कंपनीचा शेअर ५९८ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या ६ महिन्यांत रेल विकास निगमच्या शेअरमध्ये २०३ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये २२७ टक्क्यांची वाढ झाली आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रेल्वेशेअर बाजारगुंतवणूक