Railway Stock: रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या शेअरनं आज कामकाजादरम्यान उच्चांकी पातळी गाठली. हा रेल्वे स्टॉक अनेक दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं धावत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रेलटेलनं सलग तिसऱ्या सत्रात आपली तेजी कायम ठेवली. या तेजीमागचं कारण म्हणजे या कंपनीवर पडणारा ऑर्डरचा पाऊस असल्याचं म्हटलं जातंय.
आज रेलटेलचा शेअर ४७५ रुपयांवर उघडला आणि ५१३ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. अवघ्या ५ दिवसात या शेअरनं १६ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांत रेलटेलच्या शेअरमध्ये ६६ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरनं यंदा आतापर्यंत ४० टक्के परतावा दिला आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात २८६ टक्क्यांचा जबरदस्त परतावा देत आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय.
शेअरमध्ये तेजी येण्यामागे 'हे' आहे कारण
दक्षिण मध्य रेल्वेकडून रेलटेलला नुकतीच २० कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील ५२३ आरकेएम येथे आयपी-एमपीएलएस पुरविण्यासाठी दूरसंचार कामांशी संबंधित हा करार आहे. कंपनीला नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर सर्व्हिसेसकडून ८१.४६ कोटी रुपयांचे मोठं कंत्राट मिळाले आहे.
याशिवाय तामिळनाडू फायबरनेट कॉर्पोरेशनकडून २४ कोटी रुपयांचे कंत्राट मिळालं असून ते हेडएंड सिस्टमचा पुरवठा, स्थापना, एकत्रीकरण, चाचणी आणि कमिशनिंग तसंच ऑपरेशन आणि मेंटेनन्ससाठी सिस्टम इंटिग्रेटरची निवड करण्यासाठी आहे. रेलटेल पॉइंट्स ऑफ प्रेझेंस (पीओपी) उभारण्यासाठी कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून ११ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)