RVNL Share Price: जर तुम्हाला गेल्या वर्षभरात रेल्वे क्षेत्रातील चांगली कामगिरी करणाऱ्या कंपन्यांची लिस्ट तयार करायची असेल, तर त्यात रेल विकास निगम याचा देखील समावेश असेल. कंपनीनं आपल्या चांगल्या कामगिरीद्वारे गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीला मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून 543 कोटी रुपयांचं कंत्राट मिळालं असल्याची माहिती रेल विकास निगमनं दिली. त्याचा परिणाम आज कंपनीच्या शेअर्सवर दिसून आला. बीएसईवर रेल विकास निगमचे शेअर्स 5.48 टक्क्यांच्या वाढीसह 251.05 रुपयांवर उघडले.
शेअर्समध्ये 8% पर्यंत वाढ
कंपनीचा इंट्रा-डे उच्चांकी स्तर 257.55 रुपये आहे. जो गुरुवारच्या बंदच्या तुलनेत 8.21 टक्के अधिक आहे. कंपनीचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 345.60 रुपये प्रति शेअर आहे. तर, 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 60.30 रुपये प्रति शेअर आहे. कंपनीचं मार्केट कॅप 52,156.78 कोटी रुपये आहे.
वर्क ऑर्डरची माहिती
मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एलिव्हेटेड इलेक्ट्रिकल भागांचं डिझाइन आणि बांधकाम करण्यास सांगितलं असल्याचं रेल विकास निगमनं शेअर बाजाराला सांगितलं. इंदूर रेल्वे प्रकल्पासाठी कंपनीला हे काम करायचं आहे. कंपनीला हे काम १०९२ दिवसांत पूर्ण करावं लागणारे. या बातमीनंतर आज कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली.
वर्षभरात पैसे दुप्पट
गेल्या एका महिन्यात रेल विकास निगमचा हा शेअर 10.7 टक्क्यांनी घसरला आहे. प्रॉफिट बुकींगचा सामना करत असलेल्या या शेअरनं आज चांगली बातमी आणली. गेल्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 63.1 टक्क्यांनी वाढ झाली. त्याच वेळी, ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापासून स्टॉक होल्य केलाय, त्यांना आतापर्यंत 283.70 टक्के नफा मिळाला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)