नवी दिल्ली : केंद्र सरकारची अनेक मंत्रालये ट्विटर या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. सरकार आपल्या कामकाजाबाबत जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी ट्विटरचा वापर करत आहे. आता मंत्रीही आपल्या मंत्रालयाचे काम जनतेला दाखवून त्यांच्या सूचना घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असल्याचे दिसून येते. रेल्वेमंत्री अनेकदा आपल्या ट्विटरवर फोटो शेअर करून लोकांना प्रश्न विचारताना दिसतात. यावेळीही त्यांनी एक ट्विट करत जनतेला काय विचारले आहे? त्याबद्दल जाणून घ्या.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी ट्विटरवर रेल्वेच्या कोचचे फोटो शेअर केले आणि लिहिले की, "कोणती ट्रेन बनवली जात आहे, याचा अंदाज लावा?". तसेच, अश्निनी वैष्णव यांनी पुढे लिहिले, "हिंट: जॅक अँड जिल वेंट अप द हिल."
दरम्यान, रेल्वेमंत्र्यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये एक ट्रेनचा कोच दिसत आहे. या कोचमध्ये मोठ्या खिडक्या आहेत, तर दोन्ही बाजूला बसण्यासाठी एकच सीट आहे. सीटचा दर्जाही खुपच छान दिसून येत आहे.
रेल्वेमंत्र्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय आहे?रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शेअर केलेला फोटो कालका शिमला मार्गावर धावणाऱ्या ट्रेनच्या कोचचा आहे. अलीकडेच, कपूरथला येथील रेल कोच फॅक्टरीने (RCF) कालका-शिमला हेरिटेज ट्रॅकसाठी अॅडव्हान्स विस्टाडोम नॅरोगेज कोच तयार केले आहेत.