रेल्वे प्रवासादरम्यान लहान मुलांसाठी स्वतंत्र तिकीट अनिवार्य केल्याच्या वृत्ताचं रेल्वे मंत्रालयानं खंडन केलं आहे. रेल्वे मंत्रालयानं निवदेनाद्वारं यावर स्पष्टीकरण दिले आहे. नियमात असा कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असं मंत्रालयानं म्हटलंय. एक ते चार या वयोगटातील मुलांनाही रेल्वेनं प्रवास करण्यासाठी स्वतंत्र तिकीट काढावं लागणार असल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समधून करण्यात आला होता. मात्र, रेल्वे मंत्रालयानं हे वृत्त दिशाभूल करणारं असल्याचं म्हटलं आहे.
ज्यावेळी पाच वर्षांखालील मुलांना स्वतंत्र बर्थ हवा असेल, तेव्हाच त्यांच्यासाठी तिकीट खरेदी करावं लागेल. जर त्यांना स्वतंत्र बर्थ नको असेल, तर ती सुविधा पूर्वीप्रमाणेच मोफत आहे, असं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयानं दिलं आहे. पाच वर्षांखालील मुलांचा प्रवास विनामूल्य आहे. ५ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी बर्थ/सीट मागितल्यास सामान्यांकडून आकारल्या जाणाऱ्या भाड्याइतकीच रक्कम देय असेल, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. दरम्यान, यासाठी रेल्वे मंत्रालयानं ६ मार्च २०२० च्या परिपत्रकाचाही संदर्भ दिलाय.
यापूर्वी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी पाच वर्षांखालील मुलांकडून ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी शुल्क आकारलं जात असल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली होती. "रेल्वे आता गरिबांसाठी राहिली नाही. आता जनता भाजपचे संपूर्ण तिकीट कापतील," असं ते म्हणाले होते.