मुंबई: आयआरसीटीसीच्या माध्यमातून रेल्वेच्या ऑनलाईन तिकीट बुकींग करणाऱ्यांना आता आधीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहे, कारण भारतीय रेल्वेने ई- तिकीटांवर सर्विस चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला असून १ सप्टेंबर नवीन दर लागू करण्यात येणार आहे.
त्यामुळे आता आयआरसीटीसीच्या (IRCTC) माध्यमातून तिकीट बुकींग केल्यास नॉन एसी साठी 20 रुपये आणि एसीसाठी 40 रुपये जास्त मोजावे लागणार आहे. तसेच यासोबतच तिकिटावर वेगळा GST देखील लावण्यात येणार असून रेल्वे बोर्डाकडून या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.
भारतीय रेल्वे मंडळाने डिजीटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे तिकीटांवर लावण्यात येणारा सर्विस चार्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रेल्वेच्या उत्पन्नात घट झाल्याने पुन्हा सर्विस चार्ज लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ऑनलाईन तिकीटच्या माध्यमातून जवळपास 11 ते 12 लाख तिकीटे राखीव कोट्यातून बुक होत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.