आपण ट्रेनने प्रवास करत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आता रेल्वेमध्ये झोपण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. यापूर्वी रात्रीच्या प्रवासात प्रवासी जास्तीत जास्त नऊ तास झोपू शकत होते. मात्र आता ही वेळ 8 तासांवर आणण्यात आली आहे. यापूर्वी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत प्रवाशांना एसी कोच अथवा स्लीपरमध्ये झोपता येत होते. मात्र आता बदललेल्या या नियमांनुसार प्रवाशांना रात्री 10 ते सकाळी 6 वजेपर्यंतच झोपता येईल. महत्वाचे म्हणजे, ज्या गाड्यांमध्ये झोपण्याची व्यवस्था आहे, त्या सर्व गाड्यांना हा नियम लागू असणार आहे.
बऱ्याच दिवसांपासून प्रवाशांकडून केली जात होती तक्रार -
सर्व प्रवाशांना चांगली झोप घेता यावी, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. रात्री 10 ते सकाळी 6 ही वेळ झोपेसाठी चांगली मानली जाते. आपणही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, तर या वेळेचे पालन करा. हे आपल्या आणि इतर प्रवाशांच्याही झोपेसाठी योग्य आहे. खरे तर, लोअर बर्थवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अनेक दिवसांपासून तक्रार होती की, मधल्या बर्थवरील प्रवासी रात्री लवकर झोपतात आणि सकाळी उशिरापर्यंत झोपलेले असतात. यामुळे लोअर बर्थवरील प्रवाशाला त्रास होतो. महत्वाचे म्हणजे या मुद्द्यावरून अनेक वेळा प्रवासांमध्ये वादही होत होता.
...तर होऊ शकते अशी कारवाई -
या तक्रारींकडे लक्षात देत रेल्वेने झोपण्याच्या वेळेत बदल केला आहे. या नवीन नियमानुसार, मधल्या बर्थवरील प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच झोपू शकतात. यानंतर त्यांना बर्थ रिकामा करावा लागेल. जर एखादा प्रवासी नियमांचे उल्लंघण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपण त्याला रोखू शकता. या मुळे प्रवाशाला सकाळी 6 नंतर, मिडल बर्थ खाली करून खालच्या सीटवर जावे लागेल. असे न केल्यास संबंधित प्रवाशावर कारवाई होऊ शकते.