नवी दिल्ली - नववर्षामध्ये रेल्वेच्या कोट्यवधी प्रवाशांना रेल्वे प्रवासी भाडेवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. रेल्वेच्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाडेदरांना सुसंगत बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे चेअरमन व्ही. के. यादव यांनी सांगितले. मात्र त्यासाठी प्रवासी भाडेवाढ होणार का हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे. महसुलातील तूट भरून काढण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेक पावले उचलली आहेत, असेही त्यांनी सांगितले. रेल्वेच्या प्रवासी भाडेवाढीबाबत व्ही. के. यादव म्हणाले की, ''रेल्वेची भाडेवाढ करणे ही एक संवेदनशील बाब आहे. त्यासाठी अंतिम निर्णय घेण्यापूर्वी प्रदीर्घ विचारविनिमयाची गरज आहे. आम्ही प्रवासी आणि मालवाहतुकीच्या भाड्यामध्ये सुसंगती आणण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यावर विचार सुरू आहे. त्यापेक्षा अधिक मी काहीही सांगू शकत नाही. सद्यस्थिती मालवाहतुकीचे भाडे हे पूर्वीपेक्षा अधिक आहे. सध्यातरी रेल्वेकडे अधिकाधिक प्रवाशांचा आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.'' गेल्या काही काळापासून अर्थव्यवस्थेत आलेल्या सुस्तीमुळे रेल्वेच्या महसुलाला फटका बसला आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत रेल्वेच्या प्रवासी भाड्यातून होणाऱ्या उत्पन्नात पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 155 कोटींनी आणि मालवाहतुकीतून होणाऱ्या उत्पन्नात तीन हजार 901 कोटी रुपयांनी घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत रेल्वेला प्रवासी वाहतुकीच्या भाड्यामधून सुमारे 13 हजार 398. 92 कोटी रुपयांची कमाई झाली होती. मात्र दुसऱ्या तिमाहीत ही रक्कम घटून 13 हजार 243.81 कोटी रुपयांवर आली आहे.
नववर्षांत होणार रेल्वेची प्रवासी भाडेवाढ? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 10:22 PM