Join us

रेल्वे दोन वर्षांत आणखी २.३० लाख नोकऱ्या देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 2:34 AM

सध्या रिक्त असलेल्या आणखी २.३० लाख पदांवर रेल्वे येत्या दोन वर्षांत भरती करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी येथे केली.

नवी दिल्ली : सध्या रिक्त असलेल्या आणखी २.३० लाख पदांवर रेल्वे येत्या दोन वर्षांत भरती करणार असल्याची घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी येथे केली. रेल्वेकडून केली जाणारी ही दुसरी महाभरती असेल. याआधी रेल्वेने १.५० लाख विविध पदांसाठी जाहिरात दिली होती. त्यासाठी अर्ज केलेल्या दीड कोटीहून अधिक इच्छुकांच्या परीक्षा व मुलाखती घेण्याचे काम सध्या टप्प्याटप्प्याने सुरू आहे.गोयल म्हणाले, सध्या भरती प्रक्रिया सुरू असलेल्या १.५० लाख पदांवर लवकरच नियुक्त्या देण्यात येतील. याखेरीज नव्याने भरली जाणारी आणखी २.३० लाख पदे मिळून रेल्वे येत्या दोन वर्षांत एकूण चार लाख लोकांना नवे रोजगार देईल. प्रस्तावित दुसºया महाभरतीविषयी माहिती देताना रेल्वेमंत्री म्हणाले, सध्या भरल्या जात असलेल्या १.५० लाख जागा भरल्यावरही रेल्वेत आणखी १.३२ लाख पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याची अधिसूचनाही रेल्वे मंडळाकडून लवकरच काढली जाईल. येत्या दोन वर्षांत रेल्वेतून एक लाख कर्मचारी निवृत्त होतील. ती पदेही लगोलग भरण्याचे ठरविण्यात आले आहे.या नव्याने भरल्या जाणाºया पदांना अनुसूचित जाती, जमाती व ओबीसींच्या आरक्षणाखेरीज नव्याने तरतूद केल्याप्रमाणे याखेरीज अन्य वर्गांमधील आर्थिक दुर्बलांचे १० टक्के आरक्षणही लागू असेल,असेही गोयल यांनी स्पष्ट केले.१.३२ लाख पदांच्या भरतीचे काम करण्यासाठी तांत्रिक व अन्यसेवांसाठी लवकरच निविदा मागविण्यात येतील.