नवी दिल्ली : महागाई नियंत्रणात आणण्यासाठी एका टप्प्यावर रिझर्व्ह बँकेने धोरणात्मक व्याजदरांत वाढ करायला हवी, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे.
राजन यांनी सांगितले की, महागाई विरोधातील लढाई कधीही संपत नसते, ही बाब लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. भारतात महागाई वाढलेली आहे. जगातील इतर देश ज्याप्रमाणे धोरणात्मक व्याजदरात वाढ करीत आहेत, तशीच व्याजदर वाढ भारतीय रिझर्व्ह बँकेनेही करायला हवी. रिझर्व्ह बँकेने मागील तीन वर्षांपासून धोरणात्मक व्याजदरांत वाढ केलेली नाही. राजन यांनी म्हटले की, सध्याच्या परिस्थितीत राजकीय नेते आणि नोकरशहा यांनी एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, व्याजदरांत वाढ करणे हे काही विदेशी गुंतवणूकदारांना फायदा देणारे देशविरोधी कृत्य नाही. ही आर्थिक स्थैर्यात केलेली गुंतवणूक असून भारतीय नागरिकांच्या ती हिताची आहे.
सूत्रांनी सांगितले की, अमेरिकी फेडरल रिझर्व्ह आणि बँक ऑफ इंग्लंड यासारख्या अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी धोरणात्मक व्याजदरात वाढ केलेली आहे. कोविड-१९ साथीच्या काळात सर्वच देशांनी उदार धोरण स्वीकारले होते. तथापि, आता महागाईचा आगडोंब उसळल्यामुळे नियंत्रण उपाय सुरू करण्यात आले आहेत. व्याजदरांत वाढ करणे, हा त्याचाच एक भाग आहे.
... हे प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचे लक्षणव्याजदरात वाढ झाल्यानंतर कोणालाही आनंद होत नाही. मी केलेल्या व्याजदर वाढीमुळे माझ्यावर अजूनही अर्थव्यवस्थेला मागे ओढल्याचा आरोप केला जातो. तथापि, गरजेनुसार व्याजदर वाढविण्याचा निर्णय घ्यावाच लागतो. प्रगल्भ राजकीय नेतृत्व त्याची परवानगी देत असते. - रघुराम राजन