Lokmat Money > बिझनेस न्यूज > राजन यांचे ‘जैसे थे धोरण’ कायम!

राजन यांचे ‘जैसे थे धोरण’ कायम!

महागाई अजूनही उच्चांकावर असल्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या कारकीर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर करताना धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले

By admin | Published: August 10, 2016 04:04 AM2016-08-10T04:04:51+5:302016-08-10T04:04:51+5:30

महागाई अजूनही उच्चांकावर असल्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या कारकीर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर करताना धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले

Rajan's 'like-minded strategy'! | राजन यांचे ‘जैसे थे धोरण’ कायम!

राजन यांचे ‘जैसे थे धोरण’ कायम!

मुंबई : महागाई अजूनही उच्चांकावर असल्याचे कारण देत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपल्या कारकीर्दीतील शेवटचा पतधोरण आढावा सादर करताना धोरणात्मक व्याजदर ‘जैसे थे’ ठेवले.
महागाईचा दर वाढून २२ महिन्यांच्या उच्चांकावर गेला आहे. त्यामुळे दर बदलणार नाहीत, असा अंदाज आधीच व्यक्त करण्यात येत होता. त्यानुसार, रेपो रेट ६.५ टक्के, रिव्हर्स रेपो रेट ६ टक्के आणि कॅश रिझर्व्ह रेशो ४ टक्के असे कायम ठेवण्यात आले आहे.
राजन यांनी सांगितले की, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर मार्च २0१७ पर्यंत ५ टक्यांवर नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट सरकारने रिझर्व्ह बँकेला दिले आहे. या पार्श्वभूमीवर व्याजदर कायम ठेवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राणा कपूर यांनी सांगितले की, मान्सून आणि धोरणात्मक सुधारणा यामुळे महागाई कमी होईल. वित्त वर्षाच्या अखेरपर्यंत व्याजदरांत ५0 ते १00 आधार अंकांनी कपात करण्यास वाव निर्माण होऊ शकतो. आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहमाहीत व्याजदरात कपात केली जाऊ शकते, असे जाणकारांचे मत आहे. (प्रतिनिधी)


राजन यांचा हा शेवटचा पतधोरण आढावा होता. त्यांचा तीन वर्षांचा कार्यकाल ४ सप्टेंबर रोजी संपत आहे. त्याचप्रमाणे गव्हर्नरांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला हा शेवटचा पतधोरण आढावा असेल. यासाठी सरकारने पतधोरण समिती स्थापन केली.
राजन म्हणाले की, या पुढचे ४ आॅक्टोबर रोजीचे पतधोरण ६ सदस्यांची समिती ठरवेल. अर्धे सदस्य आधीच नेमण्यात आले आहेत. उरलेल्या सदस्यांच्याही लवकरच नेमणुका होतील. रिझर्व्ह बँकेच्या बोर्डाचे प्रतिनिधी म्हणून मायकेल पात्रा यांची निवड झाली.


सध्याच्या पतधोरणाची वैशिष्ट्ये
रेपो रेट ६.५0 टक्क्यांवर कायम. रिव्हर्स रेपो रेट ६ टक्क्यांवर.
कॅश रिझर्व्ह रेशो (सीआरआर) ४ टक्क्यांवर कायम.
चालू आर्थिक वर्षात जीडीपीचा वृद्धीदर ७.६ राहील.
मार्च २0१७ पर्यंत महागाई ५ टक्क्यांवर नियंत्रित ठेवण्याचे उद्दिष्ट.
सामान्य मान्सून आणि सातव्या वेतन आयोगामुळे वृद्धीला चालना मिळेल.
जीएसटीमुळे व्यावसायिक धारणा मजबूत होईल. मात्र, जीएसटीची नियोजित वेळेत अंमलबजावणी करणे हे आव्हान.
जीएसटीचा महागाईवर काय परिणाम होईल, हे आताच सांगता येणे कठीण.
५ आॅगस्ट रोजी देशाचा विदेशी चलन साठा ३६५.७ अब्ज डॉलरवर होता.
या वित्त वर्षातील चौथा पतधोरण आढावा ४ आॅक्टोबर रोजी येणार. तो समिती ठरवील.


माझ्या कामाचे परिणाम ५-६ वर्षांत दिसतील
1आपला रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ उत्तम राहिला. टीकाकारांच्या टीकेला काही अर्थ नाही. आपण उपयुक्त योगदान दिले आहे. त्याचे परिणाम येत्या ५ ते ६ वर्षांत दिसतील.
2रघुराम राजन यांनी पत्रकारांशी मनमोकळी बातचीत केली. त्यांच्यावर झालेल्या टीकेचा प्रश्न काढला असता, राजन म्हणाले की, मी विमानात असतानाही काही लोक ‘धन्यवाद’ म्हणणारे बेनामी संदेश मला पाठवीत असतात. तसेच काही लोक टीका करीत असतात; पण कौतुक किंवा टीका याला फारसे महत्त्व नसते.

3मी जे काही निर्णय घेतले, त्यातून किती रोजगार निर्माण झाला, हे उपाय वाढीसाठी किती मजबूत होते, देशाचे उत्पादन किती वाढले हे महत्त्वाचे मुद्दे आहेत. या प्रश्नांची उत्तरे ५ ते ६ वर्षांनीच मिळतील. माझ्या मते, आम्ही आमच्या समोरच्या परिस्थितीत योग्य तेच निर्णय घेतले.

Web Title: Rajan's 'like-minded strategy'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.