Join us

अदानींचे संकटमोचक ठरलेल्या राजीव जैन यांनी Airtel मध्ये खरेदी केला हिस्सा, ५८५० कोटींची गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 1:21 PM

हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानींचे संकटमोचक ठरलेल्या राजीव जैन यांनी आता एअरटेलमध्ये भागीदारी घेतली आहे.

Bharti Airtel Share Price : गेल्या वर्षी जानेवारीत हिंडेनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टनंतर फेब्रुवारी आणि मार्चमध्ये गौतम अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर मोठा परिणाम दिसून आला होता. परंतु काही काळानंतर एनआरआय राजीव जैन यांचं नाव समोर आलं होतं. त्यांनी अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली होती आणि त्यात मोठा हिस्सा घेतला होता. राजीव जैन हे GQG पार्टनर्सचे प्रमुख आहेत. आता राजीव जैन यांनी सुनील भारती मित्तल यांची कंपनी भारती एअरटेलचे ४.९ कोटी शेअर्स खरेदी केले आहेत. राजीव जैन यांनी सिंगटेलची उपकंपनी असलेल्या पेस्टेल लिमिटेडकडून हे शेअर्स खरेदी केले आहेत. 

आता सिंगटेलची भारती एअरटेलमध्ये भागीदारी २९ टक्क्यांवर आली आहे. सिंगटेलने डेटा सेंटर आणि आयटी सेवांचे कामकाज वाढवण्यासाठी आणि कर्ज कमी करण्यासाठी भारती एअरटेलमधील आपला हिस्सा विकला आहे. सिंगटेलनं ०.९५ बिलियन डॉलर्सची रक्कम उभारली आहे. यासह राजीव जैन यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीचं नाव एअरटेलच्या शेअरहोल्डर्सच्या यादीत समाविष्ट झालंय. 

गुरुवारी, राजीव जैन यांच्या जीक्यूजी पार्टनर्सनं भारती एअरटेलमध्ये ११९३.७० रुपये दरानं ४.९ कोटी शेअर्स खरेदी केले. राजीव जैन यांनी हे शेअर ५८४९ कोटी रुपयांना खरेदी केलेत. २०२२ मध्ये देखील त्यांनी एअरटेलमधील ३.३ टक्के त्यांचे स्टेक विकले होते. एअरटेल ही भारतातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे.

टॅग्स :अदानीएअरटेल