Join us  

राकेश झुनझुनवालांची स्मार्ट खेळी! Akasa Air साठी बड्या कंपनीशी करार; मोठी बचत होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 4:08 PM

राकेश झुनझुनवाला यांच्या अकासा एअरने केलेल्या नव्या करारामुळे कंपनीच्या पैशांची मोठी बचत होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

नवी दिल्ली: शेअर मार्केटमधील दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला नागरी उड्डाण क्षेत्रात पाऊल ठेवत आहेत. अलीकडेच राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa Air च्या पहिल्या विमानाची एक झलक सादर करण्यात आली होती. लवकरच ही कंपनी प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहेत. मात्र, यापूर्वी राकेश झुनझुनवाला यांनी एक स्मार्ट खेळी केली आहे. Akasa Air साठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील एका बड्या कंपनीची महत्त्वाचा करार केला आहे. यामुळे राकेश झुनझुनवाला यांची मोठी बचत होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

नागरी उड्डाण मंत्रालयाने Akasa Air च्या मॅक्स विमानांना परवानगी दिल्यानंतर राकेश झुनझुनवाला यांनी काही महिन्यातच ७२ मॅक्स विमानांच्या खरेदीसाठी बोइंग कंपनीशी करार केला. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी जुलै महिन्यात Akasa Air उड्डाणास सज्ज होऊ शकते, असे सांगितले जात आहे. यातच आता राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa Air ने आयरलँड येथील ग्रिफिन ग्लोबल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीशी करार केला आहे. 

राकेश झुनझुनवालांची होणार मोठी बचत

ग्रिफिन ग्लोबल अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीशी केलेल्या करारानुसार, विक्री आणि लीजबॅक मॉडेल अंतर्गत एअरलाइन आपली विमाने भाड्याने देणाऱ्या कंपनीला विकते आणि नंतर त्यांना परत भाड्याने देते. अशा प्रकारे विमान खरेदीवर खर्च केलेली रोख रक्कम एअरलाइनला परत मिळते. म्हणजेच राकेश झुनझुनवाला यांच्या Akasa Air ची सर्व विमाने ग्रिफिन कंपनी खरेदी करेल आणि तिच विमाने अकासा एअर कंपनी भाडेतत्त्वावर परत घेईल. यामुळे विमान खरेदीसाठी खर्च केलेली मोठी रक्कम राकेश झुनझुनवाला यांना परत मिळू शकते. याचा फायदा कंपनी संचालनासाठी होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. 

लवकरच पहिले मॅक्स ताफ्यात येणार

Akasa Air कंपनीने दिलेल्या ऑर्डरपैकी पहिले मॅक्स विमान लवकरच कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार आहे. यामुळे पुढील महिन्यात लगेचच कंपनी कार्यरत होईल, असे सांगितले जात आहे. याबाबत कराराबाबत बोलताना कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे म्हणाले की, आम्‍ही आमच्‍या उड्डयन प्रवासाला सुरुवात करत असताना ग्रिफिनला आमच्‍या प्रगतीमध्‍ये भागीदार म्‍हणून आम्‍हाला आनंद होत आहे. ग्रिफिन टीमचा प्रचंड विश्वास आणि पाठिंबा हे आकाश एअरच्या भक्कम आणि टिकाऊ भविष्याचा पाया ठरू शकेल, असे म्हटले आहे.  

टॅग्स :राकेश झुनझुनवालाविमान